मध्यपूर्वेतील युद्धात तात्पुरता विराम; इस्राईल-इराणकडून हल्ले रोखण्याची घोषणा
ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाऊल

मध्यपूर्वेतील युद्धात तात्पुरता विराम; इस्राईल-इराणकडून हल्ले रोखण्याची घोषणा
ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाऊल
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन/तेहरान: वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत पेटलेल्या संघर्षाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. इराण आणि इस्राईल या दोन्ही देशांनी एकमेकांवर सुरू केलेले लष्करी हल्ले तात्पुरते रोखण्याची घोषणा केली आहे. मात्र, शांतता कराराचे उल्लंघन झाल्यास पुन्हा अत्यंत तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा गंभीर इशाराही दोन्ही बाजूंनी एकमेकांना दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हस्तक्षेप करत दोन्ही देशांना ताकीद दिल्यानंतर हे युद्ध थांबवण्यात यश आले आहे.
रविवारी रात्री इराणने इस्राईलच्या दिशेने क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. याला उत्तर म्हणून सोमवारी पहाटे इस्राईलच्या लढाऊ विमानांनी इराणमधील लष्करी तळांना आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी केमिकल तयार करणाऱ्या एका मोठ्या कारखान्याला लक्ष्य केले. या हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेत महायुद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना हल्ले थांबवण्यास सांगितले. ट्रम्प यांच्या दबावानंतर इस्राईलने आपली पुढील लष्करी कारवाई थांबवली आहे.
दुसरीकडे, इराणच्या सशस्त्र दलांनीही एका निवेदनाद्वारे आपली मोहीम सध्या स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. इस्राईलला त्यांच्या कृत्याची ‘वेदनाशायी शिक्षा’ देण्यात आली असून, यापुढे जर इस्राईल किंवा लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर पुन्हा हल्ले झाले, तर यापेक्षाही मोठा आणि विनाशकारी हल्ला केला जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही देशवासियांना संबोधित करताना सध्या युद्ध थांबवले असले, तरी इराण आणि हिजबुल्लाह विरोधातील आमचा लढा अजून संपलेला नाही, असे स्पष्ट केले.
अमेरिकेत सध्या वॉशिंग्टन आणि तेहरान दरम्यान एका मोठ्या शांतता करारावर वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत कडक शब्दांत दोन्ही देशांना ताकीद दिली होती. ‘इस्राईल आणि इराणने ताबडतोब गोळीबार थांबवावा, कारण त्यांच्या या कृत्यामुळे शांतता प्रक्रियेत अडथळा येत आहे,’ असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच नेतान्याहू यांना इशारा देताना, जर त्यांनी अमेरिकेचा सल्ला ऐकला नाही, तर या युद्धात इस्राईलला पूर्णपणे एकटे पाडले जाईल, असेही ट्रम्प यांनी सूचकपणे सांगितल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी झालेल्या या ताज्या संघर्षात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. इस्राईलने इराणच्या महशाहर शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात १४ जण जखमी झाले असून एका पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. तर लेबनॉनमधील टायर शहरावर झालेल्या इस्राईली हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये रेड क्रॉसच्या चार बचावकर्त्यांचाही समावेश आहे. या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून जगाची चिंता वाढली आहे. सध्या दोन्ही देशांनी तलवार म्यान केली असली, तरी हा शांततेचा काळ किती टिकेल, याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.



