शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती.
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची कोल्हापूरच्या ऐतिहासिक शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी गुरुवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे कोल्हापूरच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

राज्यपाल कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, डॉ. रजनीश कामत यांची ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी असेल. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कार्यकाळ ७ ऑक्टोबर २०२५ रोजी संपला होता. तेव्हापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने विद्यापीठाच्या अनेक धोरणात्मक निर्णयांना खीळ बसली होती, जी आता डॉ. कामत यांच्या नियुक्तीमुळे दूर होणार आहे.
नवनियुक्त कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय आलेख अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले, प्राध्यापक म्हणून काम केले, त्याच विद्यापीठाच्या सर्वोच्च पदावर आज त्यांची वर्णी लागली आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातूनच इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एससी. पूर्ण केली असून गोवा विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख, संगणक शास्त्र विभागप्रमुख आणि विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता (डीन) अशी महत्त्वपूर्ण पदे सांभाळली आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, सोलापूरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थांच्या प्रभारी कुलगुरुपदाची धुराही सोपवण्यात आली होती.
या नियुक्तीसाठी राज्यपालांनी कोईम्बतूरच्या भारथियार विद्यापीठाच्या गणित विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. कंदास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय शोध समिती स्थापन केली होती. या समितीत आयआयटी इंदूरचे संचालक डॉ. सुहास जोशी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि युजीसीचे प्रतिनिधी म्हणून प्रा. एन. सी. गौतम यांचा समावेश होता. या समितीने शिफारस केलेल्या ५ प्रमुख उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राजभवन येथे घेतल्या आणि त्यानंतर डॉ. कामत यांच्या नावावर अंतिम मोहर उमटवली. या अंतिम शर्यतीत डॉ. कामत यांच्यासह विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. स्मिता देशमुख आणि डॉ. संजय ढोले यांचा समावेश होता.
डॉ. रजनीश कामत यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळातून आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्याच विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि माजी प्राध्यापक आता कुलगुरू म्हणून धुरा सांभाळणार असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपक्रमांना मोठी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. डॉ. कामत हे उद्या, २२ मे रोजी आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत.



