सवतकडा’ बनणार पर्यटकांचा ‘हॉटस्पॉट नवनवीन सुविधांनी पर्यटनाला मिळणार नवी गती
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नव्या पर्यटन सुविधांचे लोकार्पण

धबधब्यांचा राजा ‘सवतकडा’ बनणार पर्यटकांचा ‘हॉटस्पॉट नवनवीन सुविधांनी पर्यटनाला मिळणार नवी गती
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नव्या पर्यटन सुविधांचे लोकार्पण
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी ‘वनपर्यटन राज्य योजना’ आणि ‘स्टेट इको-टुरिझम’ या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सोव्हेनिअर शॉपचेही लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, एक वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सवतकडा येथील सात धबधब्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. एकाच ठिकाणी सात धबधबे असलेले हे राज्यातील दुर्मीळ पर्यटनस्थळ असून, येथे पर्यटकांना संपूर्ण कुटुंबासह मनमुराद आनंद घेता येतो. गेल्या वर्षभरात या धबधब्यांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अल्पावधीतच हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
ते पुढे म्हणाले, या निसर्गरम्य परिसराचा अधिक विकास करण्यासाठी आणि पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी आज येथे एडव्हेंचर स्पोर्ट्स उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. वनविभागामार्फत पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित झिप लाईन, लहान मुलांसाठी चिल्ड्रेन्स पार्क तसेच विविध प्रकारचे थरारक साहसी खेळ विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला सात धबधब्यांच्या निसर्गसौंदर्याचा आनंद अनुभवता येईल, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंबासह दिवसभर पर्यटनाचा आनंद लुटता येईल. या आधुनिक सुविधांमुळे संपूर्ण परिसराचे रूप पालटणार असून, सवतकडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून अधिक विकसित होईल.
यापूर्वी तिरवडे येथील कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील कॅम्प ऑफिसच्या नूतनीकरण केलेल्या सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅम्प ऑफिस परिसरात पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी (गारगोटी) ए. जी. तायनाक, सहाय्यक वनसंरक्षक वि. र. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (कडगाव) आर. डी. चौगुले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




