क्राईम न्युजताज्या घडामोडी

कॉकरोच जनता पार्टी’च्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; वाळूजमधील घराभोवती पोलिसांचा वेढा

कॉकरोच जनता पार्टी’च्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; वाळूजमधील घराभोवती पोलिसांचा वेढा

मुंबई:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि सरकारी धोरणांवर उपरोधात्मक भाषेत तिखट प्रहार करणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना आता थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीच्या प्रकारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

 ​अभिजीत दीपके हे सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क (Public Relations) विषयाचे शिक्षण घेत आहेत. तेथूनच त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे सोशल मीडिया पेज चालवण्यास सुरुवात केली होती. मागील काही दिवसांत या पेजला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच त्यांना अज्ञात क्रमांकावरून जीवे मारण्याचे संदेश आले. दीपके यांनी स्वतः ‘एक्स’ (ट्विटर) वर या धमकीच्या मेसेजचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले आहेत. या संदेशांमध्ये, “पैसे घे आणि अकाउंट बंद कर, अन्यथा भाजपमध्ये प्रवेश कर. जर आमचे ऐकले नाहीस, तर अमेरिकेतही तुला शोधून मारून टाकू,” अशा प्रकारची थेट धमकी देण्यात आली आहे. ‘नीट’ (NEET-UG) पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दीपके यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केल्यानंतर ही धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे.

 ​या धमकीची गंभीर दखल घेत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. वाळूज येथील दीपके यांच्या मूळ निवासस्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व्हॅन आणि सशस्त्र पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. परिसरातील हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

​दरम्यान, या घटनेमुळे दीपके यांचे कुटुंबही काळजीत आहे. अभिजीत यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे पालक चिंतेत होते. अभिजीत यांनी राजकारणापासून लांब राहावे, अशी त्यांची इच्छा होती. या धमकीच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे कुटुंब सध्या सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

​’कॉकरोच जनता पार्टी’चे एक्स हँडल भारतात नुकतेच प्रतिबंधित करण्यात आले होते आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही दीपके यांनी केला होता. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेली कथित टिप्पणी आणि त्यानंतरची बेरोजगारीची समस्या या पार्श्वभूमीवर १६ मे २०२६ रोजी ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ सुरू करण्यात आली होती. केवळ पाच दिवसांत या पेजचे इंस्टाग्राम फॉलोअर्स १२ दशलक्षच्या पुढे गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता या चळवळीच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल आणि दीपके यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्सबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??