आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा अभिमानास्पद टप्पा:  बी.ए. बी.एड. (एकात्मिक) कोर्ससाठी यंदा १००% प्रवेश पूर्ण

कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा अभिमानास्पद टप्पा:  बी.ए. बी.एड. (एकात्मिक) कोर्ससाठी यंदा १००% प्रवेश पूर्ण

गारगोटी – एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

 कर्मवीर हिरे कला, वाणिज्य आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने यंदा आपल्या शैक्षणिक वाटचालीत एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. अनेक वर्षांपासून बी.ए. बी.एड. (एकात्मिक) या अभ्यासक्रमात प्रवेश पूर्ण न होण्याची परंपरा मोडीत काढत, या वर्षी महाविद्यालयाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपूर्ण ८० प्रवेश पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

       खरे तर, यावर्षी ही कामगिरी सहज शक्य नव्हती. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलात येत असताना त्यातील बदलांची अंमलबजावणी, विद्यार्थी व पालकांमधील जागरूकतेचा अभाव, बी.ए. बी.एड.च्या नवीन मान्यते संदर्भातील तांत्रिक अडचणी तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. इतकेच नव्हे तर, विद्यार्थ्यांना तीन वेळा प्रवेश परीक्षा द्यावी लागली, तरीही संस्थेच्या चिकाटी, नियोजन आणि दृढ निश्चयामुळे सर्व अडचणींवर यशस्वीरित्या मात करता आली.

     या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उदयकुमार शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन हे प्रमुख कारण ठरले. शिंदे सरांनी सर्व अडचणींचे गांभीर्याने विश्लेषण करून त्या सोडवण्यासाठी योग्य आणि व्यवहार्य उपाययोजना आखल्या. त्यांनी बी.ए. बी.एड. विभागातील सर्व प्राध्यापकांना सोबत घेऊन एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा संदेश दिला. त्यांच्या सूक्ष्म नियोजन आणि संयमी नेतृत्वामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सुसंघटितरीत्या पूर्ण झाली. या प्रयत्नांमुळे प्राध्यापक व विद्यार्थी वर्गामध्ये समाधान, आत्मविश्वास आणि संस्थेबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.  

        सर्वप्रथम प्राचार्यांनी ८० विद्यार्थी संख्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. त्यानुसार प्रवेश समिती प्रमुख प्रा. विशाल आहेर आणि सदस्यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांची आखणी केली. त्यामध्ये संबंधित महाविद्यालये व विद्यार्थ्यांशी संपर्क करणे, पालक व विद्यार्थ्यांमध्ये बी.ए. बी.एड. कोर्सविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रवेश परीक्षा व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे, गरीब विद्यार्थ्याना आर्थिक मदत देणे अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता.

       हे उपक्रम प्रभावीरीत्या राबवण्यासाठी उपप्राचार्य प्रा. संजय देसाई सरांनी बारकाईने सूचना दिल्या. सहसमन्वयक आणि माजी प्रवेश समिती प्रमुख प्रा. एन. टी. जाधव यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे वेळोवेळी उपयुक्त सूचना दिल्या. प्रवेश समिती सदस्य प्रा. विक्रम राऊत, प्रा. विनोद बर्डे, प्रा. राम मेढेकर, प्रा. राजेंद्र देसाई आणि प्रा. शिवाजी देसाई यांनी प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

            विद्यार्थी संख्येचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रा. सौ. शुभांगी सूर्यवंशी, प्रा. राजेंद्र देसाई आणि प्रा. शुभांगी पाटील यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली. गत सहा महिन्यांत बी.ए. बी.एड. विभागातील सर्व प्राध्यापकांनी एकजुटीने आणि उत्साहाने काम करून हे यश प्राप्त केले.

          या प्रसंगी प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी बी.ए. बी.एड. कोर्सचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी प्रा. डॉ. अरविंद चौगुले यांनी बी. ए. बी. एड. कोर्ससाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले. उपप्राचार्य प्रा. संजय देसाई यांनी या वर्षापासून हा अभ्यासक्रम अधिक सक्षमतेने चालवला जाईल, असे नमूद केले. बी.ए. बी.एड.चे समन्वयक प्रा. शशिकांत चव्हाण यांनी सर्व प्राध्यापक इथून पुढेही एकजुटीने कार्यरत राहतील, असे आश्वासन दिले.

या यशाबद्दल सर्व स्तरावरून कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे कौतुक होत असून, ही कामगिरी संस्थेच्या संघभावना, शैक्षणिक बांधिलकी आणि उत्कृष्ट नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे. संस्थेचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई आणि संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी शुभेच्छा देऊन महाविद्यालयाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले, तसेच अशीच वाटचाल पुढेही कायम ठेवावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??