संपादकीय

जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीचा मूर्तिमंत आदर्श :  संजीवन शिल्पकार डॉ. पी. आर. भोसले

जिद्द , आत्मविश्वास

आणि चिकाटीचा

मूर्तिमंत आदर्श : 

संजीवन शिल्पकार

डॉ. पी.आर.भोसले ..

विशेष लेख :

सचिन इनामदार : कार्यकारी संपादक , नव्या युगाचा नवा भारत

जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी हे गुण ज्या माणसाकडे असतात, तो माणूस शून्यातूनही एक नवीन विश्व निर्माण करू शकतो. या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजीवनचे शिल्पकार आदरणीय डॉ. पी. आर. भोसले सर.

सन १९९४ साली केवळ सात विद्यार्थ्यांच्या बळावर त्यांनी एका निवासी शाळेचे स्वप्न पाहिले. सुरुवातीला हे स्वप्न कदाचित स्वप्नच राहील असे त्यांनाही वाटत होते. मात्र त्यांच्या मातोश्रींनी दिलेले प्रोत्साहन आणि काही विश्वासू सहकाऱ्यांची साथ यांच्या जोरावर त्यांनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले. अंबरखाना येथील नगरपालिकेच्या भाड्याच्या छोट्याशा खोलीतून संजीवन प्रशालेची सुरुवात झाली.

त्या काळात तेच या प्रशालेचे संस्थापक, प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी होते. विद्यार्थ्यांना चहा-नाश्ता देण्यापासून ते त्यांना शिक्षण देण्यापर्यंत प्रत्येक जबाबदारी त्यांनी स्वतः पार पाडली.म्हणतात ना — पानगळीनंतर पुन्हा वसंत फुलतो.अगदी त्याचप्रमाणे त्या इवल्याशा ज्ञानरोपट्याचा विस्तार होत आज ते एक बद्धमूल, विशाल वटवृक्ष बनलेले दिसते.

परंतु हा प्रवास स्वप्नवत असला तरी सोपा नव्हता. संघर्ष हा जणू त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. आजही अनौपचारिक गप्पांमध्ये ते हसत म्हणतात,

“ज्या दिवशी माझ्या डोक्यावर एखादे टेन्शन नसते, तो दिवस वाया गेला असे मला वाटते.”

आव्हाने समोर येणे, ती स्वीकारणे आणि निधड्या छातीने त्यांचा सामना करणे हे काही मोजक्या लोकांनाच जमत असते. आणि असेच लोक खऱ्या अर्थाने विजेते ठरतात.

आज संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य ठरलेल्या संजीवन समूहाचे चेअरमन असूनही भोसले सर आजही प्रशालेच्या परिसरातच राहतात. विद्यार्थ्यांबरोबर भोजन करतात, त्यांच्या अडचणी विचारतात आणि शिक्षकांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी त्यांचे दालन सदैव खुले असते. इतक्या मोठ्या संस्थेचा प्रमुख असूनही सर्वांसाठी सहज उपलब्ध असणे हे त्यांच्या माणुसकीचे जिवंत उदाहरण आहे.

सुरुवातीच्या काळात एक स्टोव्ह आणि एक खुर्ची अशा अत्यल्प साधनांच्या बळावर त्यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराळ भागात ज्ञानाचे नंदनवन फुलवले. त्या काळात संजीवन पब्लिक स्कूल या नावाने इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा सुरू झाली. हळूहळू कष्टाचे फळ मिळू लागले आणि संस्थेची कीर्ती सर्वदूर पसरू लागली.

त्या छोट्याशा ज्ञानकुंजाचे पुढे एका भव्य नॉलेज सिटीमध्ये रूपांतर झाले. शिक्षणाबरोबरच क्रीडा, सैनिकी प्रशिक्षण, नृत्य, नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांतही संस्थेचे विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवू लागले.

हा प्रवास एका रात्रीत घडलेला नव्हता. मागील तीन दशकांहून अधिक काळ भोसले सरांनी केलेले खडतर परिश्रम, अथक धडपड आणि असंख्य अडथळ्यांवर मात यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ माणसाचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात –                             

 “जो सुख-दुःखाला समान मानतो आणि आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतो, तोच खरा स्थितप्रज्ञ.”

याच स्थितप्रज्ञ वृत्तीने भोसले सरांनी एक सूत्र जपले –

“पालक ही आमची दौलत आणि विद्यार्थी ही आमची संपत्ती.”

या सूत्रावरच संजीवनची घोडदौड सात विद्यार्थ्यांपासून पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.

ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगतात —

“गुणांच्या मागे लागू नका; गुणवत्तेच्या मागे लागा.”

यासाठी त्यांनी संस्थेत गुणवत्तेला प्राधान्य दिले. कोणताही शिक्षक वशिल्याने नव्हे तर गुणवत्तेच्या आधारेच येथे कार्यरत आहे. त्यामुळेच अनेक प्रज्ञावंत शिक्षक संजीवनशी जोडले गेले आहेत. म्हणूनच भोसले सर आपल्या शिक्षकांना प्रेमाने “संजीवनची नवरत्ने” असे संबोधतात.

संस्थेचा विस्तार होत गेला तसे विविध शैक्षणिक शाखा सुरू झाल्या. स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम शाळेबरोबरच सेमी इंग्रजी माध्यम, कनिष्ठ महाविद्यालय आणि सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाखा सुरू करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने सर्व सुविधांनी सुसज्ज असे संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करण्यात आले. आज येथे अनेक ज्ञानशाखांचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. म्हणजेच केजी टू पीजी अशी संपूर्ण शिक्षणव्यवस्था एका छताखाली उपलब्ध असलेले हे अपवादात्मक उदाहरण ठरते.याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात शिक्षण मिळावे म्हणून सीबीएससी अभ्यासक्रमाचे डे-स्कूल, तसेच कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयही सुरू करण्यात आले.

आज या ज्ञानवृक्षाच्या सावलीतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, सैन्याधिकारी, कलाकार, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. ज्ञानाबरोबरच संस्कार आणि निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेली शांतता घेऊन हे विद्यार्थी नव्या युगाचे प्रगतीचे पाईक बनले आहेत.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात –

“छोटी स्वप्ने पाहणे हा गुन्हा आहे.”

हीच प्रेरणा घेऊन भोसले सरांनी परिस्थितीची पर्वा न करता आपल्या स्वप्नासाठी सर्वस्व अर्पण केले. प्रसंगी पावसाळ्यात गळणाऱ्या छोट्याशा घरात कुटुंबासह राहूनही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या प्रवासात त्यांचे बंधू एन. आर. भोसले यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. आपली प्राध्यापक पदाची नोकरी सोडून ते आपल्या बंधूप्रेमासाठी संजीवन समूहात दाखल झाले अणि नेहमीच त्यांना खंबीर साथ देत आहेत. तर दुसरीकडे सरांचे चिरंजीव सौरभ भोसले यांनीसुद्धा क्रीडा संचालक या नात्याने भव्यदिव्य टर्फ क्रीडांगण उभे केले अणि विविध स्पर्धामध्ये संजीवनच्या विजयरथाची आगेकूच सुरू ठेवली आहे.

त्यांच्या या प्रवासात पालक, विद्यार्थी, सहकारी आणि शिक्षक यांची अमूल्य साथ लाभली. त्यामुळेच संजीवन ही केवळ एक संस्था न राहता एक मोठे कुटुंब — “संजीवन परिवार” बनले आहे.

आज संजीवन हे खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर बनले असून सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने या संस्थेची वाटचाल अभिमत विद्यापीठाच्या दिशेने सुरू आहे.या प्रवासात अनेक पुरस्कार,सन्मान, त्यांना मिळाले नुकतीच त्यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली.

आकाशाएवढी उंची गाठूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून विद्यार्थ्यांमध्ये मिसळणारे, विद्यार्थ्यांशी रोज संवाद साधणारे आणि विद्यार्थ्यांनाच आपले विश्व मानणारे असे हे ज्ञानतपस्वी डॉ. पी. आर. भोसले सर आज आपल्या आयुष्यातील नव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात त्यांना यश लाभो. संजीवनच्या शाखा पुणे, मुंबईसारख्या महानगरांतही सुरू होवोत आणि या ज्ञानविश्वाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच देशभर पसरत राहो — हीच मनापासून शुभेच्छा.

©️ सचिन इनामदार वरिष्ठ समन्वयक, संजीवन विद्यालय,पन्हाळा.

( लेखक हे शिक्षक, संपादक, साहित्यिक म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहेत)

(Copyright-protected content) 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??