कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; १२ जण थोडक्यात बचावले
वडणगे फाट्याजवळ थरार : फॉर्च्युनर झाडावर आदळून पलटी, दीड तास वाहतूक ठप्प

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; १२ जण थोडक्यात बचावले
वडणगे फाट्याजवळ थरार : फॉर्च्युनर झाडावर आदळून पलटी, दीड तास वाहतूक ठप्प
कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वडणगे फाट्याजवळ आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास तीन चारचाकी वाहनांचा एकमेकांना भीषण धडक बसून विचित्र अपघात झाला. या अपघातात एक फॉर्च्युनर कार रस्त्याकडेच्या झाडावर आदळून थेट पलटी झाली, तर अन्य दोन वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातातून तिन्ही गाड्यांमधील १२ प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले असून, केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वाघबीळकडून कोल्हापूरच्या दिशेने एक मारुती ब्रिझा कार येत होती. त्याच वेळी कोल्हापूरकडून रत्नागिरीच्या दिशेने फॉर्च्युनर आणि वॅगनआर ही दोन वाहने जात होती. वडणगे फाट्याजवळ या तिन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, फॉर्च्युनर गाडीने रस्त्याकडेच्या झाडाला जोरात धडक दिली आणि ती जागेवरच पलटी झाली. या अपघातात ब्रिझा आणि वॅगनआर या दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
या अपघातावेळी ब्रिझा कारमध्ये पोलीस कर्मचारी सुशील गायकवाड हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. तर पलटी झालेल्या फॉर्च्युनरमध्ये माजी नगरसेवक दुर्वास कदम यांचा मुलगा करण कदम आणि त्याचा मित्र होता. गाडी पलटी झाल्यामुळे हे दोघेही तरुण आत अडकले होते, मात्र परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले. वॅगनआरमधील महिला आणि लहान मुलांनाही किरकोळ धक्क्यातून सावरल्यानंतर दुसऱ्या वाहनाने घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, या अपघातानंतर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर सुमारे दीड तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी बराच वेळ एकही पोलीस कर्मचारी हजर नसल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. सुमारे दीड तासानंतर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. कोल्हापूर ते बोरपाडळे दरम्यानचा हा एकेरी रस्ता सध्या अत्यंत वर्दळीचा आणि अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



