संजीवनचे प्रथम कर्मचारी आकाराम कदम यांचा सेवापूर्ती सोहळा भावस्पर्शी वातावरणात संपन्न

संजीवनचे प्रथम कर्मचारी आकाराम कदम यांचा सेवापूर्ती सोहळा भावस्पर्शी वातावरणात संपन्न
प्रसाद जाधव पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन शिक्षण समूहाच्या संजीवन विद्यानिकेतन आणि छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे संजीवनच्या शुभारंभापासूनचे निष्ठावंत कर्मचारी आकाराम महादेव कदम यांचा 32 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर सेवेचा निवृत्ती सोहळा अत्यंत भावस्पर्शी वातावरणात संपन्न झाला.
मान्यवरांच्या आणि सत्कारमूर्तींच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने सोहळ्याचा आरंभ झाला. स्वागत आणि प्रास्ताविक संजीवन विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक के. के. पोवार यांनी केले. संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर .भोसले यांनी आकाराम कदम परिवार आणि भोसले परिवार यांचे नरंदे गावातील गरीब परिस्थितीतील माणुसकीचे ऋणानुबंध आणि त्याकाळच्या आठवणींना उजाळा दिला. संजीवन शिक्षण समूहाचे संचालक आर .डी . कांडगावकर यांनी आकाराम काका म्हणजे संजीवन ज्ञानमंदिराची न दिसणारी वीट आहे असा काकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन डॉ. पी .आर. भोसले म्हणाले, आकाराम काकांचे संजीवन ज्ञानप्रवासातील योगदान अनमोल आहे आणि संजीवनच्या ज्ञान प्रवासाच्या उत्कर्षामध्ये काकांचा सिंहाचा वाटा आहे. आकाराम यांची संजीवन सेवा संजीवन परिवार कधीही विसरू शकणार नाही.
संजीवनचे माजी शिक्षक उदयकुमार साळोखे तसेच प्रसाद जाधव, धनंजय पाटील स्मिता गुजर , रूपाली सूर्यवंशी या गुरुजनांनी आकाराम काकांच्या आठवणींना उजाळा दिला. या सोहळ्याचे औचित्य साधून गुरुजनांनी भावपूर्ण गीत गायन केले. या सोहळ्याप्रसंगी संजीवन शिक्षण समूहाचे सचिव जी. एन. खराडे, संचालक संग्राम पाटील, श्रीकांत घाटगे सरकार, मोहन लोहार, कार्यकारी संचालक सौरभ भोसले, संजीवन शिक्षण समूहाच्या विविध ज्ञान शाखांचे प्राचार्य बी. आर. बेलेकर, महेश पाटील, पी. एन. पाटील, संजीवन शिक्षण समूहाच्या सर्व ज्ञानशाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.



