ताज्या घडामोडी

पंजाबमधील ३२ हजार ‘एनआरआय ‘ नवऱ्यांनी घेतला काडीमोड

एनआरआय पतींकडून फसवणुकीचे भयानक वास्तव समोर

पंजाबमधील ३२ हजार ‘एनआरआय ‘ नवऱ्यांनी घेतला काडीमोड

एनआरआय पतींकडून फसवणुकीचे भयानक वास्तव समोर

चंदीगड: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

परदेशात स्थायिक होऊन ऐषारामात जगण्याचे आणि ‘एनआरआय’ (अनिवासी भारतीय) पतीसोबत सुखाचा संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पंजाबमधील हजारो महिलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत पंजाबमध्ये तब्बल ३२ हजार महिलांना त्यांच्या एनआरआय पतींनी वाऱ्यावर सोडले असून, या महिला सध्या अत्यंत हालाखीचे आणि न्यायाच्या प्रतीक्षेतील आयुष्य जगत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंजाबमधील जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत ही चिंताजनक आकडेवारी जाहीर केली.

 ​पंजाबमध्ये सध्या ‘एनआरआय विवाह फसवणूक’ (NRI Marriage Fraud) हे एक अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक संकट बनले आहे. लग्न करून परदेशात निघून जाणे, पत्नीला भारतातच सोडून देणे किंवा परदेशात नेऊन तिचा छळ करून तिला हाकलून देणे, अशा प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंजाबमधील रूपनगर, मोहाली यांसह विविध जिल्ह्यांचा दौरा केला. तसेच ‘राष्ट्रीय महिला आपके द्वार’ या मोहिमेअंतर्गत ‘महिला जन सुनावणी’ घेत पीडित महिलांच्या तक्रारी थेट ऐकून घेतल्या.

 ​या आढावा बैठकांमध्ये विजया रहाटकर यांनी पंजाब पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावले. पीडित महिलांच्या तक्रारींवर कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, निश्चित कालमर्यादेत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये तर केवळ तीन दिवसांच्या आत ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ (केलेली कारवाई) सादर करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. एनआरआय विवाह फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगाने व्हावा, यासाठी आंतर-एजन्सी समन्वय आणि वेळेवर कायदेशीर हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे असल्याचे रहाटकर यांनी स्पष्ट केले.

​महिला आयोगाने या प्रकरणात केवळ पोलीस तपासावरच भर दिला नाही, तर रूपनगर येथील जिल्हा कारागृहाची पाहणी करून तेथील महिला कैद्यांच्या पायाभूत सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता मानकांचीही तपासणी केली. पंजाबमधील हे चित्र देशातील इतर राज्यांसाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. लग्न ठरवताना होणारी घाई, मुलाच्या पार्श्वभूमीची अपुरी चौकशी आणि परदेशाचे वाटणारे अंध आकर्षण यामुळे हजारो तरुण मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासन आता या ३२ हजार पीडित महिलांना कसा आणि किती वेळात न्याय मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??