क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगाव येथे रंगले गझल मंथनचे ५७ वे गझल संमेलन 

जळगाव येथे रंगले गझल मंथनचे ५७ वे गझल संमेलन 

जळगाव: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गझल मंथन साहित्य संस्था आयोजित खानदेश विभागीय एकदिवशीय गझल संमेलन जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील हे संमेलनाध्यक्ष होते तर गझलकार व व्यंगचित्रकार शिवाजी जवरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव जयवंत वानखेडे, नाशिकचे गझलकार संजय गोरडे, अकोल्याचे गझलकार निलेश कवडे,जिल्हा न्यायाधीश पुरूषोत्तम जाधव तसेच डॉ. राहुल पाटील उपस्थित होते.   

सुरुवातीला सरस्वती पूजनानंतर गझल सम्राट सुरेश भट व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय गझलकारा मंजुषा पाठक, ज्योती वाघ व आशा साळुंखे यांनी करून दिला. 

 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खान्देश विभागीय गझलकारांचा प्रातिनिधिक गझल संग्रह ‘गझलयात्री-५’ तसेच मुशायरा समिती अध्यक्ष मुकुंदराव जाधव यांच्या ‘बळी’ या गझलसंग्रहाचे तसेच गझलकार कवी सुधीर महाजन यांच्या ‘तारांगण शब्दांचे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुकुंदराव जाधव व त्यांचे मोठे बंधू सच्चिदानंद जाधव यांनी देहदानाचा संकल्प केल्याबद्दल त्यांचा देखील प्रेरणादायी कार्य म्हणून संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या एकदिवसीय गझल संमेलनाचे प्रास्ताविक करताना गझलकार काशिनाथ गवळी यांनी संस्था अखिल भारतीय स्तरावर गझलेच्या प्रचार प्रसारासाठी नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याचे नमूद केले.                                     

संस्थेच्या माध्यमातून गझल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गझलकारांना दर दोन वर्षांनी दिला जाणारा ‘गझलयात्री पुरस्कार २०२६’ यावर्षी नाशिकचे सुप्रसिद्ध गझलकार नंदकिशोर ठोंबरे व जळगावचे कवी गझलकार सुधीर महाजन यांना मोठ्या सन्मानाने प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सन्मानपत्राचे वाचन सुप्रसिद्ध गझलकार काशिनाथ गवळी यांनी केले तर आभार गझलकारा मंजुषा पाठक यांनी मानले. 

दुसऱ्या सत्राची सुरुवात निमंत्रितांच्या गझल मुशायऱ्याने झाली. दोन मुशायऱ्यांनंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनावकाशानंतर पुढील तीन मुशायरे घेण्यात आले. सर्व अतिथी तसेच सर्व गझलकारांनी आपल्या गझलांचे प्रभावीपणे सादरीकरण करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या गझल संमेलनाचा समारोप समारोपाच्या अध्यक्षीय भाषणानंतर झाला.             

 हे गझल संमेलन यशस्वीपणे पार पडण्यासाठी मार्गदर्शक सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजीभाऊ काळे व सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहलताई कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी यांनी वेळोवेळी प्रेरणा घेऊन खान्देश विभाग व जळगाव जिल्हा कार्यकारिणीचा उत्साह वाढवला. खान्देश विभाग प्रमुख काशिनाथ गवळी,उपविभाग प्रमुख नंदकिशोर ठोंबरे, सचिव बाळासाहेब गिरी, सहसचिव यशश्री रहाळकर, कोषाध्यक्ष अतुल देशपांडे,सह कोषाध्यक्ष सचिन साताळकर, नाशिक जिल्हा अध्यक्षा मृणाल गीते, समन्वयक गोरख पालवे, अलका कुलकर्णी, स्मिता बनकर, गझल संमेलन समीती अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंदराव जाधव जळगाव जिल्हा कार्यकारिणीचे सुधीर महाजन, ज्योती वाघ, मंजुषा पाठक, प्रवीण लोहार, आशा साळुंखे, अ‍ॅड. विलास मोरे धुळे अध्यक्षा अनिता खैरनार आदींनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर महाजन यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??