बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धक्कादायक ई-मेलने खळबळ : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कसून तपासणी

बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धक्कादायक ई-मेलने खळबळ : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कसून तपासणी
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धक्कादायक ई-मेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत खात्यावर आला असून, आज दुपारी दोन वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्याची धमकी दिल्याने प्रशासनात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या या मेलमुळे सुरक्षेसंदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तातडीने सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या.धमकीचा मेल मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कार्यालयाच्या मुख्य दालनापासून सर्व कक्ष तातडीने रिकामे करण्यात आले.त्यानंतर बॉम्ब शोध पथक (BDDS) आणि श्वान पथक धावून आले असून सध्या संपूर्ण इमारतीची,दालनांची आणि परिसराची कसून तपासणी सुरू आहे.श्वानांच्या मदतीने प्रत्येक विभागात संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान,कोल्हापूर पोलिस दल,स्थानिक गुन्हेशाखा,तसेच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत.आपत्कालीन वाहने आणि अलर्ट स्थिती पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, पोलिसांनी नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.संपूर्ण परिसरात सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून कोणताही धोका टाळण्यासाठी तपास पथक सखोल पाहणी करत आहे.धमकीची सत्यता तपासणे, मेल पाठवणाऱ्याचा शोध घेणे आणि या प्रकरणाचा गुन्हेगारी हेतू काय आहे,याविषयी पोलीस तपास सुरू आहे.या धक्कादायक मेलमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण घटनेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे.परिस्थिती नियंत्रणात असून तपास पूर्ण होईपर्यंत परिसर सील ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



