जलसाक्षरतेतून सुरक्षित व उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश

जलसाक्षरतेतून सुरक्षित व उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आपल्या आईप्रमाणे नदी मातेची देखील सातत्याने चौकशी करून तिची देखील सेवा करावी व पाणी जतन- संवर्धन करून, पाणी प्रदूषण रोखण्यासाठी छोटे छोटे घरगुती उपाय करावेत.विद्यार्थिनी जर शालेय वयातच जलसाक्षर बनल्या तर त्यांचे भविष्य उज्ज्वल व सुरक्षित होईल असे प्रतिपादन जलतज्ज्ञ, लेखक,सामाजिक कार्यकर्ते व “चला जाणूया नदीला” या अभियानाचे महाराष्ट्र राज्य शासनाचे अशासकीय सदस्य रमाकांत कुलकर्णी यांनी केले.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित “जलसाक्षरता उज्वल भविष्यासाठी ” या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थिनी व सर्व शिक्षकांशी व्याख्यानातून संवाद साधला.औद्योगिक सांडपाणी,घरगुती कचरा, पाण्याचा होणारा अपव्यय, जलस्त्रोतांचे बेफाम होत चाललेले प्रदूषण, नष्ट होत चाललेली वृक्ष संपत्ती या साऱ्यांचा वातावरण बदलावर होत असलेला परिणाम,यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम व अशा परिस्थितीत विद्यार्थिनींनी घ्यावयाची दक्षता, करावयाचे सोपे सोपे उपाय त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
आपल्या स्वागत व प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका ए.एस.काजी यांनी दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व सांगून प्रशालेत आयोजित अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमांचा विद्यार्थिनींनी आपल्या भावी जीवनासाठी कसा उपयोग करून घ्यावा हे सांगितले व व्याख्यात्यांचा स्वागत सत्कार केला.
अध्यक्षीय मनोगतात पर्यवेक्षिका व्ही.एस.लोटके यांनी घरगुती पाण्याचा वापर काटकसरीने करून, सण-समारंभात होणारा पाण्याचा अपव्यय व प्रदूषण विद्यार्थिनींनी कसे टाळावे, त्याचबरोबर जलसुरक्षा हा विषय फक्त पुस्तक व गुणांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा आणावा याचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेमध्ये घेतलेल्या पर्यावरणपूरक घोषवाक्य स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आभार पर्यवेक्षक एस.एस.कोळी यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.रॉड्रीग्युस यांनी केले.यावेळी विद्यार्थिनींनी कुटुंबात व समाजामध्ये पाणी संवर्धन करण्यासाठीचा संकल्प केला व जल सुरक्षिततेच्या घोषणा दिल्या. कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


