पन्हाळगडावर शाही दसरा महोत्सवात चित्रकला व शिल्पकला स्पर्धा उत्साहात

पन्हाळगडावर शाही दसरा महोत्सवात चित्रकला व शिल्पकला स्पर्धा उत्साहात .
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नुकताच पन्हाळगडचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत दोन दिवसीय (27 व 28 सप्टेंबर) राज्यस्तरीय चित्रकला व शिल्पकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि हैदराबाद येथील तीनशे चित्रकार आणि शिल्पकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेचे सहप्रायोजक म्हणून आर्या ग्रुप ऑफ कंपनी, कोल्हापूर आणि श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह, वारणानगर यांनी पाठबळ दिले.
तीनशे कलाकारांनी ऐतिहासिक कला रंगवत पन्हाळगडाचा वारसा सजीव केला. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन 27 सप्टेंबर रोजी खासदार धैर्यशील माने आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाले. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही या उपक्रमास भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले. स्पर्धेत स्थानिक विद्यार्थ्यांसह राज्यांतील नामांकित चित्रकार आणि शिल्पकारांनी सहभाग नोंदवला. विशेषत: मुंबईतील अनेक चित्रकार विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला.

चित्रकला स्पर्धेसाठी किल्ले पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग हा विषय होता, तर शिल्पकला स्पर्धेसाठी किल्ले पन्हाळगडावरील ऐतिहासिक प्रसंग आणि वास्तू हा विषय देण्यात आला. या स्पर्धेच्या आयोजनामागे ऐतिहासिक वास्तू आणि घटनांमधून युवकांना प्रेरणा देणे तसेच उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचा उद्देश होता. दोन दिवसांत पन्हाळगडावर आलेल्या असंख्य पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी या स्पर्धेतील सहभागींच्या कलाकृतींचे जवळून निरीक्षण करून कौतुक केले.
पन्हाळा नगर परिषदेमार्फत दरवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते, परंतु यावर्षी शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच शिल्पकला स्पर्धेचाही समावेश करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने यापुढे दरवर्षी शाही दसरा महोत्सवात हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत रविवारी दुपारी थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निसर्ग चित्र थेट प्रात्यक्षिकाद्वारे सुप्रसिद्ध चित्रकार संजय शेलार व मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार मनोज कुमार सकळे यांनी सर्व सहभागी चित्रकारांसमोर रेखाटले.
ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठ्या बक्षीस रकमेची स्पर्धा असून, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकास 55 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 33 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 11 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अशी एकूण दीड लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शिल्पकला स्पर्धेत प्रथम क्रमांकास 22 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 11 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी प्रत्येकी 3 हजार रुपये अशी एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

स्पर्धेचे निकाल जाहीर करण्याचे कामकाज दोन दिवस चालणार असून, 1 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पन्हाळगडाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच कलाकारांना त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नगरपरिषद मुखाधिकारी चेतन कुमार माळी व त्यांचे कर्मचारी यांच्यासह सचिन पाटील, चैतन्य भोसले, रवींद्र धडेल यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला व उपस्थित स्पर्धकांच्या आवश्यक व्यवस्थेबाबत काम पाहिले.


