सुपरकेन नर्सरी टेक्निक् पुस्तक ऊस उत्पादकांच्या हिताचे :गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन.

सुपरकेन नर्सरी टेक्निक् पुस्तक ऊस उत्पादकांच्या हिताचे :गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन.
शानदार समारंभात सुपरकेन नर्सरी टेक्निक् पुस्तकाचे प्रकाशन
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आजची ऊस शेती फायदेशीर करायची असेल तर सुपरकेन नर्सरी टेक्निक सारखं पर्यायी उत्तम तंत्रज्ञान ऊस उत्पादकांच्या हाती दिले पाहिजे. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार केला पाहिजे. हे मी माझ्या शेतावर एकरी दीडशे टन उत्पादन घेताना आधी केले, आणि आता त्याचे अनुभवसिद्ध पुस्तक रूपाने तयार झालेले आहे. ते प्रत्येक ऊस उत्पादकांनी स्वतःकडे बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले. ते प्रा. डॉ. बाळकृष्ण जमदग्नि आणि सहलेखक डॉ. बी. पी. पाटील यांनी लिहिलेल्या सुपरकेन नर्सरी टेक्निक या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी संचालक मच्छिंद्र बोखारे होते. गणपतराव पाटील पुढे म्हणाले, उद्याची ऊस शेती अधिक फायदेशीर करायची असेल तर बेणे बदलाला प्राधान्य दिले पाहिजे. अतिशय कमी पैशामध्ये आपण हे सहज, सोप्या सुपरकेन नर्सरी टेक्निकने करू शकतो. हे आम्ही करून दाखविले आहे. याचे जनक ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नि सर आहेत. त्यांनी राज्याच्या अनेक भागामध्ये सिद्ध करून दाखविलेले हे तंत्रज्ञान ग्रंथ रूपाने येते आहे. त्याचा ऊस उत्पादकांनी फायदा करून घेतला पाहिजे. प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याते आले. दत्त उद्योग समूह आणि कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. लेखक डॉ. जमदग्नि यांनी त्यांनी केलेल्या सुपरकेन नर्सरी टेक्निकची सविस्तर माहिती दिली. त्याचा विस्तार कसा होत गेला हे सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, कृषि शास्त्रज्ञ प्रा. अरूण मराठे, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, कृषिरत्न डॉ. संजीवदादा माने, प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण आणि मच्छिंद्र बोखारे यांची भाषणे झाली. ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, प्रसाद कुलकर्णी, रावसाहेब पुजारी, प्रा. डॉ. बी. पी. पाटील, डॉ. केशव पुजारी, डॉ. दशरथ ठवाळ, निळकंठ मोरे, डॉ. सौ. मृण्लानी जमदग्नी, उत्तमराव जाधव, दिलीप जाधव, आदित्य घोरपडे-बेडगकर, संग्रामसिंह देसाई, अनिल देशमुख, अजयकुमार पुजारी यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचा शेतकरी कडेलोटाच्या टोकावर : यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या दयनीय स्थितीची परखड अशी मांडणी केली. ते म्हणाले, संशोधकांनी कितीही चांगले संशोधन केले तरी ते जोपर्यंत शेतकऱ्यांच्या रानात उतरत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. मधल्या दलालांनी सगळी यंत्रणा पोखरलेली आहे. शेतकरी कडेलोटाच्या टोकावर उभा आहे. आज बियाणेवाले, कीटकनाशकेवाले, रासायनिक सेंद्रिय खतेवाले म्हणजे शेतकरी जगताला लागलेला कॅन्सर आहे. तो शेतकऱ्यांना खाऊन टाकतो आहे. त्यांनी चोहोबाजूंनी शेतकऱ्याला ओरबडण्याचे काम केलेय. त्याला उभा करण्यात कुणालाच स्वारस्य नाही. त्याचा मेंदू सडलाय. हे आपले आजचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.


