आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

शिरोळ येथे ऊस आंदोलनाची ठिणगी: 3800₹ ऊस दर मिळेपर्यंत ऊस तोड बंद. शिरोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिरोळ येथे ऊस आंदोलनाची ठिणगी: 3800₹ ऊस दर मिळेपर्यंत ऊस तोड बंद. 

शिरोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

सोमवारी 11 वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेणार  शिरोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ गावात ऊस दराच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना ऊस दराचे आंदोलन करत असताना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज 1 नोव्हेंबर रोजी शिरोळ गाव बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला शिरोळ गावातील नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शिरोळ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

 त्यातच आज सकाळी 11 वाजता शिरोळ व परिसरातील युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची छ. शिवाजी तख्त शिरोळ येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे, स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी, यशवंत उर्फ बंटी देसाई, दिपक पाटील, राकेश जगदाळे, प्रदीप जाधव, धिरज शिंदे, सचिन सूर्यवंशी, महेश जाधव यांनी आपापले विचार व्यक्त केले. 
  यावेळी एकमुखाने ऊस दराचा तोडगा निघे पर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकरी, पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन सर्व ऊस तोंडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत सर्व उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आला. 
यावेळी बोलताना.उल्हासदादा पाटील म्हणाले, आंदोलन कोण करत आहे याला महत्व नाही, तर आंदोलन कशासाठी होत आहे याला महत्व आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा ऊस आंदोलनाचा लढा द्यायचा आहे. त्याचबरोबर चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, ही घटना अतिशय चीड आणणारी आहे. कारखाना व्यवस्थापनाने मारहाण करायला रस्त्यावर यायचं काही कारण नाही, त्यांनी त्यांचं काम कारखान्याच्या मिटिंग हॉल मध्ये करावे असेही ते म्हणाले.
     प्रगतशील शेतकरी बंटी देसाई म्हणाले, स्वाभिमानी व अंकुश या दोन्ही संघटनानी एकत्र येऊन समस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देण्याची गरज आहे. आम्ही ऊस उत्पादक शेतकरी तुमच्या मागे ठाम आहे. मतदारांना पैसे वाटताना कारखानदारांची इर्षा असते पण, उसाचे पैसे देताना मात्र ही इर्षा दिसून येत नाही. सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी, तोडणी वाहतूक वेगळी असताना एकच दर यांचा निघतोय कसा…?

 

स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना म्हणजे बऱ्याच वर्षानंतर दंडूकशाहीचा पुरावा पुन्हा एकदा दिसून आला आहे, आणि तो जर थांबवायचा असेल तर, पुन्हा एकदा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याची गरज आहे.
धनाजी चुडमुंगे यावेळी बोलताना म्हणाले, “कारखान्याच्या संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कारखान्यातून मिळणारे सर्व फायदे घेण्याचे बंद करावे. आणि मग आम्हाला चौकात सांगायला यावे की, आम्हाला हा दर परवडतोय” तर आम्ही मान्य करू. बगलबच्चांनी स्वतः कारखान्याचा फायदा घ्यायचा आणि शेतकऱ्याची गळचेपी करायची हे चालणार नाही. जो जो या ऊस दराच्या आडवा येतोय तो खरा शेतकरीच नाही.
यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.शेवटी आभार युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??