आपला जिल्हाताज्या घडामोडी

सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृती जागरचे अकरावे पुष्प गुंफताना प्रा. अशोक दास यांचे साहित्यिकांच्या सहवासात या विषयावर व्याख्यान 

सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृती जागरचे अकरावे पुष्प गुंफताना प्रा. अशोक दास यांचे साहित्यिकांच्या सहवासात या विषयावर व्याख्यान

इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सवी स्मृतीजागर गेले अकरा महिने साहित्य, संगीत आणि कला क्षेत्रातील छोटी छोटी अकरा संमेलने घेऊन केवळ इचलकरंजीकरच साजरा करू शकतात. इचलकरंजी शहराची म्हणून एक खास साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रातील प्रतिमा आहे. या शहरात पाचही मंगेशकर भावंडांसह निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज कार्यक्रमासाठी येऊन गेले व आजही येतात.पु ल. देशपांडे , सुनीता देशपांडे,कुसुमाग्रज, कुंजबिहारी , बा.भ.बोरकर ,वसंत बापट ,द.मा. मिरासदार ,मंगेश पाडगावकर, वसंत बापट आदी अनेक साहित्यिकांचा सहवास इचलकरंजीमुळेच मलाही मिळू शकला असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व नामवंत वक्ते प्रा. अशोक दास यांनी व्यक्त केले. ते सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृती जागरचे अकरावे पुष्प गुंफताना ” साहित्यिकांच्या सहवासात ” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एस. पी.मर्दा होते. प्रा. रोहित शिंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.                 प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्याबरोबर झालेल्या काही भेटींच्या आठवणी दिलीप शेंडे यांनी उलगडल्या.       प्रा. अशोक दास यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या आजवरच्या प्रवासातील अनेक थोर साहित्यिकांच्या सहवासाच्या आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बारकाव्यासह स्पष्ट करून सांगितल्या. तसेच मोठ्या माणसातील साधेपणाच त्यांना मोठे करत असतो हेही सांगितले. त्याचबरोबर इचलकरंजी शहराची सांस्कृतिक महत्ताही स्पष्ट केली.                                    अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. एस.पी. मर्दा यांनी पु. ल.देशपांडे यांच्या व्यक्तित्वासह सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या आठवणींचा जागर केला. दिलीप शेंडे यांच्या स्वानंदी या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास जयप्रकाश शाळगावकर, काशिनाथ जगदाळे, दिपश्री शेंडे,वैशाली नायकवडे, अरुण दळवी ,आरती लाटणे ,रेखा पाटील ,वैशाली राऊत, स्वाती गोंदकर, सुखदा देशपांडे, सुनीता कळंत्रे,श्वेता लांडे, बी . एम.पाटील, नागेश पाटील, गणेश टिके, रोहिणी कुलकर्णी, वैशाली मिराशी,विदुला नातू , शंकर उडपी, शिवाजी रेडेकर ,विजय कुलकर्णी आदींसह साहित्य कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??