संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार ही आपली नैतिक जबाबदारी: प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार ही आपली नैतिक जबाबदारी: प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात करून हे संविधान स्वतःप्रत अर्पण करत आहोत असा समारोप करणारी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सर्वांगीण समतेकडे नेणारी आहे. राज्यघटनेमध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता,लोकशाही, सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही सर्व मूल्य विद्यार्थीदशेतच अंगी बाणवली तर खऱ्या अर्थाने आपण आदर्श नागरिक आपण बनू शकतो. आणि या देशाच्या विचारधारांचा स्वातंत्र्याचा वसा आणि वारसा आपण सक्षमपणे पुढे नेऊ शकतो. ती आपली नागरिक म्हणून नैतिक जबाबदारीही आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प करणे हाच संविधान दिनाचा खरा उद्देश आहे.असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते वीरशैव उत्कर्ष मंडळ इचलकरंजी संचलित ज्ञानबातात्या दत्तवाडे हायस्कूल व जुनिअर कॉलेज , श्री मृगेंद्रअण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्यामंदिर आणि डी.एम. बिरादर बालविद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात”भारतीय संविधान “या विषयावर बोलत होते.
अध्यक्षस्थानी विभागप्रमुख विकास शिवाजी देवमोरे होते. संविधान जागर अभियानाच्या संघटक सुषमा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. ए.आर. मगदूम यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ. आर.एस.जगताप यांनी करून दिली.
प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत भारताची सक्षम वैचारिक परंपरा,भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्यात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व समिती सदस्यांचे योगदान, सरनाम्यातील प्रत्येक मूल्याचे महत्त्व, गेल्या शहात्तर वर्षाची वाटचाल , आजची वर्तमानकालीन परिस्थिती आणि स्वातंत्र्याची शताब्दी होईल त्यावेळी बलशाली भारताच्या उभारणीसाठी आपण निवडायची भविष्याची दिशा , विद्यार्थ्यांची, तरुणांची आणि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी याबाबत सविस्तर मांडणी केली.यावेळी संविधान जागर अभियानाच्या संयोजक संघटक सुषमा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले व संविधानाच्या ओव्या सादर केल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना विकास देवमोरे यांनी संविधानाच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले.सहाय्यक शिक्षक कृष्णा अडकिल्ला यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. एस. के. पाटील यांनी केले.



