रसिकांच्या उस्फूर्त गजरात पन्हाळ्यात रंगले गझल संमेलन : गझलयात्री 6 गझलसंग्रहाचे प्रकाशन

रसिकांच्या उस्फूर्त गजरात पन्हाळ्यात रंगले गझल संमेलन : गझलयात्री 6 गझलसंग्रहाचे प्रकाशन
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात गझल मंथन साहित्य संस्था, कोरपनामार्फत एक दिवशीय गझल संमेलन वाह वाहच्या गजरात व गझलकारांच्या शेरांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादात अतिशय उत्साहात साजरे झाले. संस्थेच्या पुणे कार्यकारिणीच्या कोल्हापूर विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष प्रफुल्ल कुलकर्णी उद्घाटक डॉ. मंदार खरे, स्वागताध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी, संयोजन समन्वयक प्रदीप तळेकर या ख्यातनाम गझलकारांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव प्रा. एन. आर.भोसले यांच्याहस्ते दीपप्रज्वलन,सरस्वती पूजन तसेच गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.
गझल मंथन संस्थेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन इनामदार यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तुत केली.याप्रसंगी पुणे विभागातील गझलकरांच्या गझलयात्री ६ या प्रातिनिधिक गझल संग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी गझल संग्रहावर उत्कृष्ट असे भाष्य केले. तर प्रदीप तळेकर यांनी गझलमंथन संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पुढील उपक्रमांची माहिती दिली.
सोहळ्यात बोलताना प्रमुख अतिथी एन. आर. भोसले यांनी गझलकार कधीच निवृत्त होत नाही असे सांगत सर्व गझलकारांना शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या गझलकारांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रफुल्ल कुलकर्णी यांनी गझलेपासून आपल्याला काय मिळाले यापेक्षा मी गझलेला काय दिले याचा विचार गझलकारांनी करावा असे सांगतानाच युवा गझलकारांनी गझलेला साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लिहीत रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी मिरज येथील ख्यातनाम गझलकार भीमराव धुळुबुळू उपस्थित होते.
यानंतर दिवसभरात चार मुशायऱ्यात अनेक नामवंत गझलकारांनी आपल्या अप्रतिम गझलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बीड, जालना,सांगली, सातारा,पुणे कोल्हापूर येथील पन्नास गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या. महिलांचे लक्षणीय प्रमाण हेही या गझल संमेलनाचे वैशिष्ट्य होते.
या मुशायऱ्यांच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. राज रणधीर, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. तरुजा भोसले, हे होते. तर मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन वैशाली माळी, राणा दौंड , मंदार अयचित, बाळासाहेब गिरी व डॉ. दयानंद काळे यांनी केले .

संपूर्ण दिवसभर चाललेल्या या गझल संमेलनासाठी गझल मंथन संस्थेचे अध्यक्ष अनिल काळे,उपाध्यक्ष देवकुमार, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे तसेच राज्य कार्यकारिणीचे अॅड. मुकुंदराव जाधव, भारत माळी, बा. ह. मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली माळी, मुग्धा कुळये व धनंजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन इनामदार यांनी केले.



