श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंती भक्तांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरी.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंती भक्तांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरी.
नृसिंहवाडी :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
श्री दत्त जयंतीसाठी आलेल्या भक्तांच्या अलोट गर्दीत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमून गेले.अखंड दत्त नामस्मरण, दिगंबरांच्या भजनाचा गजर आणि भक्तिभावाने शुचिर्भूत झालेले वातावरण यामुळे कृष्णा–पंचगंगा संगम तीर्थ परिसरात मंगलमय सोहळा अनुभवास आला. आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चांदीच्या पाळण्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.जन्मकाळावेळी भाविकांनी अबीर–गुलाल आणि फुलांची उधळण करत श्रींचे दर्शन घेतले. पाळणा गीते, आरत्या आणि प्रार्थनांनी मंदिर परिसर दुमदुमला.पहाटे तीन वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक आणि दुपारी श्रींच्या चरणकमलावर महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप झाले. दुपारी पवमान पंचसुतांचे पठण झाल्यानंतर सायंकाळी साडेचारला उत्सव मूर्तीची मुख्य मंदिरात मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. काने बुवा कवठेगुलंद यांच्या कीर्तनानंतर जन्मकाळ विधी संपन्न झाला. रात्री धूपदीप आरती व पालखी सोहळाही झाला.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी थंडीतही दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी दत्त देवस्थान, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांनी उत्तम व्यवस्था केली होती. सीसीटीव्ही, दर्शनरांग, मुखदर्शन, महाप्रसाद,सुंठवडा प्रसाद, सूचनाफलक, ध्वनीव्यवस्था, नदीकाठची सुरक्षा, तसेच वाहतूक व पार्किंगची सोय सुरळीत होती. एसटी खात्याने अतिरिक्त बसेस सोडून गर्दी नियंत्रणास मदत केली. पोलीस व गृहरक्षक दलाने बंदोबस्त सांभाळला.स्थानिक विद्यार्थी, स्वयंसेवक आणि संस्थांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले. प्रसिद्ध नृसिंहवाडीचे पेढे, खवा, बासुंदी, बर्फी आदींच्या खरेदीसाठीही मोठी गर्दी झाली.विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. सर्वांच्या सहकार्याने दत्त जयंती सोहळा अत्यंत सुरळीतपणे पार पडला.



