10 वी व 12 वी च्या परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

10 वी व 12 वी च्या परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
कोल्हापूर एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) साठी 73 तर माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) साठी 141 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा नाही त्या दिवशी वगळून) दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा केंद्रे व उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन जवळ बाळगणे, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य वापरणे किंवा बाळगणे, तसेच झेरॉक्स/ फॅक्स मशीन आणि लॅपटॉपचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार शिक्षेस पात्र राहिल. परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली उपकरणे वापरण्यास ही बंदी लागू राहणार नाही.


