क्राईम न्युजताज्या घडामोडी

रेल्वे सिग्नल यंत्रणा निकामी करून प्रवाशांची लूट; मानवत रोड स्थानकावरील घटना

रेल्वे सिग्नल यंत्रणा निकामी करून प्रवाशांची लूट; मानवत रोड स्थानकावरील थरार, कोल्हापूर-पुणे रेल्वेतील गुन्ह्याच्या घटनेची पुनरावृत्ती

परभणी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत जाणीवपूर्वक तांत्रिक बिघाड करून रेल्वे गाडी थांबवणे आणि प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. मानवत रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री काकीनाडा-साईनगर एक्स्प्रेसला लक्ष करत चोरट्यांनी महिला प्रवाशांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर-पुणे मार्गावर सह्याद्री एक्स्प्रेसमध्येही अशाच पद्धतीने सिग्नलशी छेडछाड करून लूट करण्यात आली होती, त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

​काकीनाडा-साईनगर एक्स्प्रेस ही परभणीकडून साईनगरकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मानवत रोड स्थानकाजवळ आली. या स्थानकावर गाडीला अधिकृत थांबा नसतानाही अचानक सिग्नल ‘लाल’ झाल्याने चालकाने गाडी थांबवली. सिग्नलमध्ये बिघाड झाला असावा, असे चालकाला वाटले, मात्र हा चोरट्यांचा पूर्वनियोजित कट होता. गाडी थांबताच रेल्वे रुळांच्या बाजूला अंधारात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी खिडकीजवळ बसलेल्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी पळापळ आणि घबराट पसरली.

​या घटनेने काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कराडनजीक शेणोली स्टेशनवर घडलेल्या सह्याद्री एक्स्प्रेसमधील लुटीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ११ एप्रिल रोजी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेसलाही अशाच प्रकारे सिग्नलमध्ये बिघाड करून रोखण्यात आले होते आणि प्रवाशांचे दागिने व मोबाईल लुटले होते. दोन्ही घटनांची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) सारखीच असल्याने, रेल्वे मार्गावर एखादी तांत्रिक ज्ञान असलेली संघटित टोळी सक्रिय असावी, असा संशय बळावला आहे. 

​मानवत रोड येथील घटनेनंतर परळी आणि नांदेड रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेसारख्या संवेदनशील तंत्रज्ञानाशी चोरटे सहजपणे छेडछाड करत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या लुटीमुळे रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे सावट असून, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवून या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??