आंबेनळी घाटात भीषण अपघात; साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
महाबळेश्वर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात पर्यटकांच्या एका स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत साताऱ्यातील ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे आठही तरुण सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना आंबेनळी घाटातील एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात घडला. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने अपघातग्रस्त गाडीचा शोध घेणे आणि मृतदेह बाहेर काढणे हे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्याने आणि घाट परिसर अतिशय बिकट असल्याने बचाव कार्यात अडचणी आल्या होत्या.
सकाळी प्रशासनासह स्थानिक ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. दरीत कोसळलेल्या गाडीचा चक्काचूर झाला असून, या दुर्घटनेत गाडीतील सर्व आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आंबेनळी घाट हा त्याच्या अतिधोकादायक वळणांसाठी आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. यापूर्वीही या घाटात अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. या घटनेनंतर घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पर्यटकांनी आणि वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या पोलीस या अपघाताचा सविस्तर तपास करत असून, मृतांची अधिकृत ओळख आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती प्रशासनाकडून लवकरच जाहीर केली जाईल



