आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू

कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे. पुणे येथील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील यांनी या निवडणुकीसाठीचा सुधारित मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

​राजकुमार पाटील यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, मंगळवार, दि. २६ मे २०२६ पासून मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. गोकुळशी जोडलेल्या प्राथमिक दूध संस्थांना आता आपापले प्रतिनिधी निश्चित करून त्यांचे ठराव सादर करावे लागणार आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि निवडणूक नियम २०१४ मधील तरतुदीनुसार राबवला जाणार आहे.

​निवडणूक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:

​२६ मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत प्राथमिक दूध संस्थांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करणे. त्यानंतर २ जून २०२६ ते १ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित संस्थांना त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या नियुक्तीचे ठराव तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत.

​गोकुळ ही केवळ एक सहकारी संस्था नसून कोल्हापूरच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदार यादीच्या घोषणेमुळे आता राजकीय हालचालींना वेग आला असून, येणाऱ्या काळात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठीची प्रशासकीय जबाबदारी आता पुणे येथील निवडणूक प्राधिकरणाने स्वीकारली असून, त्यांनी ठरवून दिलेल्या कालमर्यादेतच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??