आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

पर्यटनाचा आनंद घ्या, पण नियम पाळा ! कोल्हापूर वन विभागाचे आवाहन

पर्यटनाचा आनंद घ्या, पण नियम पाळा ! कोल्हापूर वन विभागाचे आवाहन

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पावसाळ्याची सुरुवात होताच कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील सवतकडा, बर्की, रामतिर्थ, तिलारी या धबधब्यांसह प्रसिद्ध मसाई पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी केले आहे.

​पर्यटनाचा आनंद घेताना धबधब्याच्या खोल पाण्यात उतरणे, धोकादायक कड्यांवर जाऊन सेल्फी काढणे आणि निसरड्या दगडांवर चढ-उतार करणे पर्यटकांनी पूर्णपणे टाळावे. पर्यटनस्थळांवर सोबत असलेल्या लहान मुलांवर पालकांनी सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे मद्यपान करून पर्यटनस्थळी किंवा पाण्यात उतरू नये. तसेच वन विभाग, पोलीस व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आणि सुरक्षा फलकांचे काटेकोर पालन करावे, असा सल्ला वन विभागाने दिला आहे.

​निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यटन परिसरात प्लास्टिक, काचेच्या बाटल्या किंवा इतर कोणताही कचरा टाकू नये. वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन करू नये आणि वनक्षेत्रात मोठ्या आवाजात संगीत वाजवणे टाळावे. अतिवृष्टी, पाण्याची पातळी अचानक वाढणे किंवा प्रतिकूल हवामान निर्माण झाल्यास धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

​कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात किंवा तातडीच्या मदतीची आवश्यकता भासल्यास पर्यटकांनी वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय गारगोटीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक (९४२२७०१२२१), पेंडाखळे-शाहूवाडीचे किशोर आहेर (८६५२४९६२५३), आजऱ्याचे सचिन सावंत (९०४९५०१३१४), पाटणे-चंदगडच्या शीतल पाटील (९४२२९७४०३८) आणि पन्हाळ्याचे अजित माळी (९४०५२९१५२३) यांच्याशीही नागरिकांना थेट संपर्क साधता येईल.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??