सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच उरकले होते लग्न ; पोलिसांचा खळबळजनक दावा
लोहगड हत्या प्रकरण

क्राईम न्यूज: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
लोहगड हत्या प्रकरण: संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच उरकले होते लग्न ; पोलिसांचा खळबळजनक दावा
पुणे: वृत्तसंस्था

लोणावळा जवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून पती केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता एक नवे आणि अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले असल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट आणि इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला असून, या दोघांनीही आपल्या कुटुंबापासून ही लग्नाची गोष्ट पूर्णपणे लपवून ठेवावी अशी काळजी घेतली होती.
व्यावसायिक केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा चालू वर्षाच्या १९ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता. पोलीस सूत्रांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सिया आणि चेतन यांचा हा गुपचूप विवाह याच साखरपुड्याच्या आसपास झाला असावा. मात्र, हे लग्न साखरपुड्याच्या नेमके आधी झाले की नंतर, याविषयी पोलीस अजूनही अधिकृत माहिती गोळा करत आहेत. केतनच्या हत्येमागे केवळ लग्नाला नकार देणे हाच हेतू नसून, त्यामागे एक सुनियोजित कट आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक दडलेली असल्याचे तपासात समोर आले आहे.
लग्न ठरल्यापासून सिया गोयल हिने खरेदी आणि लग्नाच्या इतर तयारीच्या बहाण्याने केतनकडे वारंवार पैशांची मागणी केली होती. केतनने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जवळपास एक कोटी रुपयांची मोठी रक्कम तिच्या स्वाधीन केली. मात्र, सियाने या पैशांचा वापर स्वतःच्या विवाहासाठी न करता, ती संपूर्ण रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली. चेतनची आर्थिक पार्श्वभूमी कमकुवत असल्याने त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची आणि वेळेची गरज होती. याच कारणामुळे या दोघांनी मिळून केतनला वाटेतून हटवण्याचा कट रचला. गुन्हा पचवून भविष्यात एकत्र येण्यासाठी त्यांनी तीन वर्षांचा एक विशेष प्लॅन तयार केला होता, ज्यानुसार केतनच्या मृत्यूनंतर संशय टाळण्यासाठी सिया पुढील तीन वर्षे लग्न करणार नव्हती आणि त्यानंतर दोघे अधिकृतपणे विवाह करणार होते.
या हत्येचा कट अंमलात आणण्यापूर्वी सियाने अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या वेब सिरीज, पॉडकास्ट आणि देशातील विविध गुन्ह्यांची माहिती इंटरनेटवर शोधली होती. पोलिसांची दिशाभूल कशी करायची आणि पुरावे कसे नष्ट करायचे, याचे नियोजन तिने याद्वारे केले होते. १८ जून रोजी सियाने केतनला वाढदिवसाचे निमित्त काढून लोहगड किल्ल्यावर आणले, जिथे चेतन आधीच दुचाकीवरून पोहोचला होता. किल्ल्याच्या एका कड्यापाशी गेल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसण्याचा संकेत केला आणि ती खाली बसताच मागे लपलेल्या चेतनने पुढे येऊन गाफील असलेल्या केतनला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.
सुरुवातीला सियाने हा केवळ एक अपघात असल्याचा बनाव रचला होता. मात्र, केतनच्या कुटुंबीयांच्या संशयानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि व्हॉट्सॲप चॅट तपासले असता हा पूर्वनियोजित खुनाचा कट असल्याचे उघड झाले. सध्या दोघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, गुपचूप लग्नाच्या या नव्या दाव्यामुळे पोलीस आता या प्रकरणाच्या मूळ मुळापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेगाने तपास करत आहेत.



