क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धा : संजीवन विद्यालयाचा शानदार विजय, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धा : संजीवन विद्यालयाचा शानदार विजय, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पन्हाळा येथील संजीवन नॉलेज सिटीच्या अत्याधुनिक टर्फ मैदानावर पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत संजीवन विद्यालयाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद पटकावले . या विजयामुळे संजीवन विद्यालयाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली असून संपूर्ण क्रीडा वर्तुळातून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संजीवन नॉलेज सिटीच्या अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इचलकरंजी या भागातून एकूण आठ नामांकित संघ सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या विभागीय स्पर्धेत सुरुवातीपासूनच संघामध्ये विजयासाठी तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली.

​स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवन विद्यालयाने सांगली मनपाच्या अल्फान्सो स्कूलवर ६ विरुद्ध ० अशा मोठ्या गोल फरकाने दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची धडाक्यात सुरुवात केली. या सामन्यात संजीवनच्या वतीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना शुभंकर भाटे याने तीन गोल नोंदवले, तर पार्थ खवरेने दोन आणि पुन्शिबाने एक गोल करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दुसऱ्या सामन्यात सातारा येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलने सांगली जिल्हाच्या कृष्णा व्हॅली संघावर ४ विरुद्ध ० गोल करत विजय मिळवला. सातारा संघाच्या विजयात राजवीर नाईक निंबाळकर आणि आर्यन दळवी यांनी प्रत्येकी दोन गोल करीत प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी दिली नाही. तिसऱ्या उपांत्य सामन्यात इचलकरंजी मनपाचा संघ उपस्थित राहू शकल्यामुळे सिंधुदुर्ग संघाला पुढे चाल देण्यात आली. चौथ्या सामन्यात कोल्हापूर मनपाच्या महाराष्ट्र स्कूलने रत्नागिरी संघाविरुद्ध ३ गोलांनी विजय मिळवत पुढची फेरी गाठली.

​या स्पर्धेच्या पुढील टप्प्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा संजीवन स्कूल आणि सिंधुदुर्ग संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत संजीवन विद्यालयाने सिंधुदुर्ग संघाचा ६ विरुद्ध ० अशा गोल फरकाने धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर मनपाच्या महाराष्ट्र हायस्कूल संघाने साताराच्या श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूलवर २ विरुद्ध ० गोलने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

​अंतिम सामना कोल्हापूर मनपाच्या महाराष्ट्र स्कूल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या संजीवन विद्यालय यांच्यात अत्यंत अटीतटीचा झाला. या रोमहर्षक अंतिम सामन्यात संजीवन विद्यालयाच्या खेळाडूंनी कमालीचा समन्वय व आक्रमक खेळ दाखवत महाराष्ट्र स्कूलवर ३ विरुद्ध ० गोलने विजय मिळवला आणि सुब्रतो मुखर्जी विभागीय करंडकावर आपले नाव कोरले. या अंतिम सामन्यात संजीवनकडून पार्थ खवरे याने दोन, तर कर्णधार शुभंकर भाटे याने एक गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 ​संजीवनाच्या या संघाला प्रशिक्षक अमित साळोखे, रणजित विचारे तसेच क्रीडाशिक्षक सागर पाटील आणि जयंत कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले आणि क्रीडा संचालक सौरभ भोसले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन संघाला मिळाले.

​स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी श्री. सुधाकर जमादार, सहायक क्रीडा अधिकारी श्री.अजिंक्य चौगले तसेच कोल्हापूर सॉकर रेफ्रीअसोसिएशनचे प्रदीप साळोखे यांनी विशेष परिश्रम घेतले. संजीवन नॉलेज सिटीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धा शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाल्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??