कोतोलीत जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण अटकेत, तीन लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोतोलीत जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण अटकेत, तीन लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पन्हाळा एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोतोली गाव हद्दीतील चांभारकी शेताजवळील पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी प्रकाश हिंदुराव लव्हटे (३५, रा. कणेरी रोड, कोतोली) याच्या मालकीच्या शेडमध्ये जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. त्यावेळी संशयित आरोपी संदिप नामदेव लव्हटे (३८), सर्जेराव श्रीपती मेगाणे (४४), दिपक शिवाजी गवळी (४५) व समर्थ पांडुरंग पाटील (३१) सर्व राहणार कोतोली तीनपानी पत्त्याचा पलास नावाचा जुगार खेळताना पोलिसांच्या हाती सापडले.कारवाईदरम्यान २२,५०० रुपये रोख, पाच मोबाईल हॅण्डसेट, पाच मोटारसायकली आणि पत्त्याचे संच असा एकूण ३,१३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पो. कॉ. सचिन शंकरराव जाधव यांनी फिर्याद दिली असून सर्व संशयित आरोपींविरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.