जयसिंगपुरात भटके कुत्रे सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा- मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी
जयसिंगपुरात भटके कुत्रे सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा- मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी
जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शहरात अन्य जिल्ह्यातील शहरे आणि गावांमधून भटक्या कुत्र्यांना सोडण्यात येत आहे. शहरानजीक असणाऱ्या औद्योगिक वसाहतींसह इतर भागांमध्ये हे भटके कुत्रे मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहेत. शहरात भटके कुत्रे सोडणाऱ्यांवर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याबद्दल पालिकेमार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा, मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी दिला आहे. जयसिंगपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष करण्यात आले आहे. पंधरा-वीस कुत्र्यांकडून एकच वेळी नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री अपरात्री घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पालिका प्रशासनाकडून लवकरच कुत्र्यांचे निर्बीजीकारणाची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र शहरात भटके कुत्रे आणून सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहराबरोबरच शहरानजीक सांगली जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे सोडले जात आहेत. यावर पालिका अंकुश लावणार आहे. शहरातील मटण, चिकन, मच्छी विक्रेत्यांना पालिकेने नोटीस लागू केल्या आहेत. वाया जाणारे मांस इतरत्र न टाकता ते पालिकेच्या घंट्यागाड्यांमध्ये टाकण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत. जेणेकरून कुत्री मोठ्या संख्येने मटण, चिकन, मच्छी मार्केट परिसरात दिसणार नाहीत. याबरोबरच हॉटेल, हातगाडी चालकांना देखील अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नागरिक भटक्या कुत्र्यांपासून कसे सुरक्षित राहतील याचा विचार करून योग्य ते प्रयत्न केले जातील. पालिकेच्यावतीने लवकरच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू होणार आहे. यानंतर कुत्र्यांचा धोका बहुतांश प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. गेल्या काही दिवसातच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अचानकपणे वाढली आहे. नागरी भागामध्ये अशा कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन ठोस पावले उचलणार असल्याची माहिती मुख्याधिकारी टीना गवळी यांनी दिली.


