वृत्तपत्र पत्रलेखकांची भूमिका ही अथांग समाजसागरामध्ये दीपगृहासारखी : डॉ. माणिकराव साळुंखे

वृत्तपत्र पत्रलेखकांची भूमिका ही अथांग समाजसागरामध्ये दीपगृहासारखी : डॉ. माणिकराव साळुंखे
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
वृत्तपत्र पत्रलेखकांची भूमिका ही अथांग समाजसागरामध्ये दीपगृहासारखी असते. वृत्तपत्र पत्रलेखकांनी सत्याची कास धरावी. अफवांच्या जाळ्यातून समाजाला बाहेर काढून सत्याचा प्रकाश पसरवण्याचे काम वृत्तपत्र पत्रलेखक करत असतात. सामाजिक,आर्थिक ,राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये वृत्तपत्र पत्रलेखकांचा जीवनविषयक, राष्ट्रविषयक व वैश्विक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. त्यासाठी वृत्तपत्र पत्रलेखकांनी सकस स्वरूपाचे वाचनही केले पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी येथे इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा २८ वा वर्धापनदिन आणि आचार्य शांतारामबापू गरुड जनजागृती पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी पांडुरंग पिसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. माणिकराव साळुंखे यांचा सत्कार करून त्यांचा परिचय करून दिला. अभिजीत पटवा यांनी आचार्य शांताराम गरुड जनजागृती पुरस्कारामागील वृत्तपत्र पत्रलेखक संघाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वादविवादाचे, मतमतांतराचे महत्त्व मोठे असते. धर्मापेक्षाही माणुसकीचा विचार महत्त्वाचा असतो. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची श्वसनयंत्रणा असतात. त्यामुळे ती मुक्त असली पाहिजे. त्यांचा श्वास गुदमरता कामा नये. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम माध्यमांनी व वृत्तपत्र पत्रलेखकानी केले पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञानाने मानवी मेंदू आणि विचारांमध्ये मोठे बदल होत आहेत. मानवी हक्कांना बाधित करणारे कायदे आणले जात आहेत. विकासाच्या चुकीच्या संकल्पनेमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे. समाज जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी आणि त्याच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्यापेक्षा फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. देशासाठी संविधान सर्वश्रेष्ठ आहे. हे सारे वृत्तपत्र लेखकांनी समजून घेतले पाहिजे. डॉ.साळुंखे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणामध्ये भारतासह जगभरच्या विविध लेखकांच्या ग्रंथांचे दाखले दिले.
यावेळी शितल भाऊसाहेब मगदूम (इचलकरंजी) नामदेव तुकाराम पाटील ( आजरा) माधुरी नंदकुमार मेस्त्री (निपाणी )आणि गजानन भीमराव खोत (तारदाळ) यांना डॉ.साळुंखे यांच्या हस्ते आचार्य शांताराम बापू गरुड जनजागृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच वृत्तपत्र पत्रलेखक प्रा. राकेश शेटके यांचा नेट परीक्षेतील यशाबद्दल डॉ. साळुंखे यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंडित कोंडेकर, मनोहर जोशी, रमेश सुतार ,संजय भस्मे ,महेंद्र जाधव, महादेव मिणची, दिगंबर उकिरडे, दीपक पंडित आणि सर्व पत्रलेखकाने मेहनत घेतली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण गुरबे यांनी आभार मानले.


