परीक्षेला सामोरे जाताना : संवाद विद्यार्थ्यांशी

परीक्षेला सामोरे जाताना : संवाद विद्यार्थ्यांशी
सचिन इनामदार , कोल्हापूर
प्रिय विद्यार्थी मित्रांनो……
उद्यापासून तुमच्या आयुष्यातील इयत्ता दहावीची एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या कामकाजात काम करणारा एक घटक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनातली भीती आणि उत्तरपत्रिकेतील त्यांच्या चुका मी जवळून अनुभवल्या आहेत. याच अनुभवाच्या जोरावर आज मी तुमच्याशी थेट संवाद साधत आहे.
सर्वात आधी एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधा की, ही परीक्षा म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासातील केवळ एक टप्पा आहे. तुमच्या जीवनातील अनेक परीक्षांपैकी ही एक परीक्षा आहे, त्यामुळे दडपणाखाली न राहता पूर्ण आत्मविश्वासाने या प्रवासाचा आनंद घ्या. बोर्डाची परीक्षा ही तुमच्या शाळेतील परीक्षेपेक्षा निश्चितच सोप्या काठीण्य पातळीची असते. तुमच्या शिक्षकांनी शाळेत कदाचित तुमचे पेपर कडकपणे तपासून तुमच्या चुका निदर्शनास आणल्या असतील, पण त्याचा उद्देश तुम्हाला बोर्डासाठी तयार करणे हाच होता. त्यामुळे ‘बोर्डाचा पेपर खूप कठीण असतो’ हा बागुलबुवा मनातून काढून टाका.
या परीक्षेतील यशाचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. तुम्ही वर्षभर जी मेहनत घेतली आहे, जो अभ्यास केला आहे, त्यावरच परीक्षेतील प्रश्न असणार आहेत. “मला सर्व काही आठवणार आहे आणि मी पेपर उत्तमच लिहिणार आहे,” हा विचार स्वतःशी वारंवार करा. तुमची सकारात्मक मानसिकता तुम्हाला ऐनवेळी कठीण प्रश्नांची उत्तरे आठवण्यास मोठी मदत करते. लक्षात ठेवा, ही परीक्षा तुमच्या यशाचे नवे मार्ग शोधून देणार आहे, मात्र ही परीक्षा म्हणजेच सर्वस्व नाही.
परीक्षेच्या दोन-अडीच तासांत वेळेचे योग्य नियोजन करणे हा विजयाचा दुसरा मंत्र आहे. प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर ती सर्वप्रथम पूर्णपणे वाचून घ्या. लिहायला सुरुवात करताना वेळेची बचत करण्यासाठी जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवा. उत्तरपत्रिका लिहिताना सांगोपांग मांडणी आणि स्वच्छता याला परीक्षक म्हणून आम्ही खूप महत्त्व देतो. उत्तरपत्रिकेत व्हाईटनरचा (Whitener) वापर अजिबात करू नका. जास्त खाडाखोड टाळा; जर एखादा शब्द किंवा ओळ चुकली असेल, तर त्यावर पेन्सिलने किंवा पेनाने फक्त एक आडवी रेष मारा. यामुळे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल आणि परीक्षकावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल.
उत्तरपत्रिका लिहिताना तांत्रिक बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्या. प्रश्नांचे आणि उपप्रश्नांचे क्रमांक अचूक लिहिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तरपत्रिकेवर तुमची ओळख पटेल असा कोणताही अनावश्यक मजकूर किंवा खुणा करू नका. पेपरला जोडलेल्या पुरवण्या धाग्याने घट्ट बांधा आणि मुख्य पृष्ठावरील रकान्यात त्यांची एकूण संख्या लिहायला विसरू नका. एखादा प्रश्न पूर्णपणे येत नसेल, तरी तुम्हाला त्याबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी नक्की लिहा. बोर्डात पायरीनुसार (Step-wise) गुण दिले जातात, हे विसरू नका.
पेपर संपल्यानंतर घाईघाईत केंद्र सोडू नका. परीक्षा केंद्रातून बाहेर पडण्यापूर्वी आपले सर्व लेखनसाहित्य, कंपास पेटी, विशेषतः आपले हॉल तिकीट आणि ओळखपत्र आपल्याकडे नीट घेतले आहे ना, याची खात्री करा. अनेकदा गडबडीत विद्यार्थी या महत्त्वाच्या वस्तू बेंचवरच विसरतात, ज्यामुळे पुढच्या पेपरला मानसिक ताण येऊ शकतो.
शेवटी एक अनुभवी शिक्षक म्हणून सांगेन की, कॉपीसारख्या कोणत्याही गैरमार्गाचा आधार घेऊ नका. कष्टाने मिळवलेले गुणच तुम्हाला आयुष्यात खरी ओळख मिळवून देतील. परीक्षेच्या दिवसांत पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि आनंदी मन हीच तुमची खरी बलस्थाने आहेत. पेपर संपवून बाहेर आल्यावर झालेल्या चुकांवर चर्चा करत वेळ वाया घालवू नका; त्याऐवजी पुढच्या पेपरच्या तयारीला जोमाने लागा.
तुम्ही सर्वजण या परीक्षेला अत्यंत धैर्याने, शिस्तीने आणि आनंदाने सामोरे जाल, याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांना या बोर्ड परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!
( लेखक ज्येष्ठ शिक्षक व बोर्डाच्या विविध कामाचा 25 वर्षांचा अनुभव असलेले नामांकित शाळेतील अनुभवी शिक्षक आहेत. )



