विशेष लेख /पत्रकारिता आणि वृत्तपत्रांची भूमिका:

विशेष लेख /पत्रकार दिन. पत्रकारिता आणि वृत्तपत्रांची भूमिका:
सचिन इनामदार – कार्यकारी संपादक : एन वाय नवा भारत न्यूज नेटवर्क
लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे पाहिले जात असते. मात्र आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भाऊगर्दीत छापील वृत्तपत्रे मागे पडतील का ?असा प्रश्न वारंवार उपस्थित होता असताना दिसत आहे. प्रथमतः पण हे लक्षात घेतले पाहिजे की वृत्तपत्र ही जगातील अशी एकमेव संस्था असेल की ज्या व्यवसायामध्ये विक्री ही उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत केली जाते. कोणतेही वृत्तपत्र आपण पाहिले तर त्याचा उत्पादन खर्च त्याची विक्री किंमतीपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे आपल्याला लक्षात येते.
वृत्तपत्राचा इतिहास पाहता स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेली वृत्तपत्रे ही देशप्रेमाच्या भावनेने लोकशिक्षण , लोकप्रबोधन व अन्याय निवारण या हेतूने इंग्रजांच्या विरोधात तसेच देशातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधातीलही एक शस्त्र म्हणून वापरले गेले. वृत्तपत्रांचा जनजागृतीसाठी वापर अनेक महनीय लोकांनी उदात्त हेतूने करून घेतला. लोकमान्य टिळक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नंतरच्या काळात अनेक संपादकांनी वृत्तपत्र हे समाजसुधारणेसाठी एक साधन म्हणून वापरले.कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळात या वृत्तपत्र क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय व भांडवली कंपन्यांनी शिरकाव केला आणि वृत्तपत्र हे लोकशिक्षण लोकप्रबोधन याचबरोबर मनोरंजनाच्या दृष्टीनेही कार्यरत होऊ लागले.
कोणतेही वृत्तपत्र उभे करत असताना त्यासाठी प्रथम मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते आणि हे भांडवल एका रात्रीत वृत्तपत्र परत मिळवून देऊ शकत नाही त्यासाठी; सातत्याने लोकांच्या आवडीचे विषय, लोकांच्या गरजेचे विषय, लोकांच्या भावभावना, लोकांच्या अपेक्षा अशा अनेक गोष्टींवर भर देऊन वृत्तपत्राला लोकप्रिय व्हावे लागते या निर्भीड पत्रकारितेमध्ये लोकप्रिय होणे याचा अर्थ जनतेची दिशाभूल करणे असा कधीच नसतो.त्या अनुषंगाने इंग्रजीमध्ये एक म्हण आहे एक नोकर एकाच वेळी दोन मालकांना खूश करू शकत नाही त्याच प्रकारे एखाद्या वृत्तपत्राची भूमिका ही त्या वृत्तपत्राच्या ध्येयधोरणानुसारच ठरत असते आणि वृत्तपत्राने एकदा पूर्ण विचारांती घेतलेली भूमिका हे ती वृत्तपत्र कधीही बदलत नाही यासाठी होणारा कोणत्याही प्रकारचा विरोध, कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या अडचणी यासाठी ते वृत्तपत्र सज्ज असते.

म्हणूनच आजच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळात सुद्धा सामान्य लोकांना जोपर्यंत एखादी बातमी वाचक स्वतः वृत्तपत्रात वाचत नाहीत; तोपर्यंत त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. आणि म्हणूनच पत्रकारिता हा व्यवसाय जरी असला तरीसुद्धा ते एक समाजसेवेचे व्रत आहे अर्थातच हे व्रत चालू ठेवण्यासाठी जाहिरातींचा आधार त्याला घ्यावा लागतो ही आर्थिक अपरिहार्यता आहे. याचाच अर्थ सर्व वृत्तपत्रे विकली गेलेली आहेत किंवा सगळीच वृत्तपत्रे निर्भीडपणे व्यक्त होत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या काही मर्यादा या सर्वच वृत्तपत्रांना पाळाव्या लागतात.
जसे की पहिल्या पानावर जाहिरात छापणे,जाहिरात पुरस्कृत पुरवण्या काढणे वगैरे मात्र प्रत्येक व्यवसायाचे काही नियम असतात काही तत्वे असतात यालाच नीतिमूल्ये असे म्हणतात. आणि ही नीतिमूल्ये सर्वच वृत्तपत्रांनी पाळावी अशी अपेक्षा धरली जाते आणि ती रास्तही आहे.यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य विकले जाऊ नये, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होऊ नये. त्याचबरोबर वृत्तपत्रातील जाहिरातीही स्वीकारल्या पाहिजेत.या सर्वच बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
यामुळे उठसूठ वृत्तपत्रांवर काहीही बोलणे अयोग्य आहे. तसेच आपलीच भूमिका योग्य आहे याचा वृत्तपत्राला आग्रह एखाद्याने करणे हेही अयोग्यच आहे. समाजहितास बाधक अशा गोष्टी कोणतेही वृत्तपत्र करत नाही त्यामुळेच आजही वृत्तपत्रे आपली विश्वासार्हता टिकवून आहेत. कारण प्रामाणिक पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार आहेत की ,ज्यांनी आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे खडतर मेहनत करून अथकपणे परिश्रम करून पत्रकारिता जोपासलेली आहे. हे लोक वृत्तपत्रांची विश्वासार्हता समाजामध्ये उंचावण्यास कारणीभूत आहेत.मात्र याचाच एक दुसरा भागही आहे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे काही पत्रकार लोकांच्याकडून या नीतिमत्ता पाळल्या जात नसतीलही; मात्र याचाच अर्थ सर्व वृत्तपत्र क्षेत्र हे विकले गेलेले आहे असे म्हणणेही अयोग्य होईल.
प्रत्येकाच्या भूमिका या वेगळ्या असतात काहींच्या भूमिका सोयीनुसार बदलतात किंबहुना त्या बदलाव्या लागतात आणि वृत्तपत्रही याला अपवाद नाही ज्यावेळी जी परिस्थिती असते त्याचे यथार्थदर्शन वाचकांना करून देणे हे वृत्तपत्राचे प्रमुख ध्येय आहे आणि म्हणूनच वृत्तपत्र हे काळानुसार एखाद्या विषयावरची आपली भूमिका नक्कीच बदलू शकते. या कालसुसंगत बदलामुळेच वाचक, वृत्तपत्र आणि समाज यांचे एक घनिष्ठ नाते बनलेल्या असते यातूनच वृत्तपत्रे ही माणसाच्या बौद्धिक गरजा भागवत असतात म्हणूनच वृत्तपत्रे ही महत्त्वाची होती आहेत आणि यापुढेही राहतील.
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या आद्य पत्रकार अणि संपादक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज साजरी करत असताना.आपण लक्षात घेतले पाहिजे की, ब्रिटिशांच्या राजवटीत एखादे वृत्तपत्र चालवणे म्हणजे सोपे काम नव्हते. मात्र आपल्या खिशातील पैसे घालून, नुकसान पत्करून त्याकाळच्या समाजसुधारकांनी आपले कार्य सुरू ठेवले.
बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये सुरू झाले व पुढे हे 1840 पर्यंत चालले. या पत्रकारितेच्या खडतर प्रवासाचे स्मरण करून समकालीन परिस्थितीमध्येही वृत्तपत्रे म्हणजे प्रिंट मिडीया आजही सामान्य वाचकांचे विश्वासार्ह माध्यम म्हणून टिकून राहिलेले आहे .ते कार्य नव्या ताकदीने पुढे नेणे हे आजच्या पत्रकारितेचे कर्तव्य आहे.

