आपला जिल्हाताज्या घडामोडी

भारतीय संघराज्यापुढील नव्या पेचप्रसंगाची कारणे लक्षात घ्यावी लागतील समाजवादी प्रबोधिनीत ” केंद्र – राज्य संबंध” विषयावरील परिसंवादातील मत

भारतीय संघराज्यापुढील नव्या पेचप्रसंगाची कारणे लक्षात घ्यावी लागतील

समाजवादी प्रबोधिनीत ” केंद्र – राज्य संबंध” विषयावरील परिसंवादातील मत


इचलकरंजी
*एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क*
भारतीय समाजाच्या अंतरंगात मूलगामी बदल होत
असून त्याचे परिणाम येथील संघराज्य व्यवस्थेवर आणि केंद्र राज्य संबंधावर होत आहेत. भाषा – भाषांतील विसंवाद, उत्तर – दक्षिण भारत यातील सांस्कृतिक व राजकीय भेद आणि पुढील काळात येऊ घातलेले लोकसभा मतदार संघाचे परिसिमन ही या नव्या पेचप्रंसंगाची काही कारणे आहेत असे मत शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ” केंद्र – राज्य संबंध ” या विषयावर परिसंवादात बीजभाषण करतांना बोलत होते. प्राचार्य आनंद मेणसे सहवक्ते होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर होते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी, राज्याराज्यांत बोलीभाषा व प्रमाण भाषा यांच्यामध्ये निर्माण झालेले तणाव, लोकसंख्या वाढीतील फरकामुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या संसदेतील जागा उत्तरेच्या प्रमाणात कमी होणे व उत्तर व दक्षिण भारतातील राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचा अनुशेष निर्माण होणे ही या पेचप्रंसंगाची कारणे आहेत.

प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, देशाच्या विकासात दक्षिणेकडील राज्यांचा वाटा वाढता आहे पण केंद्राकडून विषमनिधी वाटप, राज्यपाल पदाचा राजकीय स्वार्थासाठी वापर, दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी व संस्कृत लादण्याचे प्रयत्न व रोजगारासाठी लक्षावधी लोकांचे स्थलांतर ही केंद्र राज्य संबंधाच्या पेचप्रसंगाची लक्षणे आहेत.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. चौसाळकर म्हणाले, भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन केंद्र सरकारने विशिष्ट भाषा व संस्कृती लादण्याचा प्रयत्न करू नये. विकास निधी वाटप व लोकसभेतील जागांची फेरमांडणी याबाबत संपूर्ण देशाचे व मागास भागांचे हित लक्षात घेऊन राजकीय नेतृत्वास निर्णय घ्यावे लागतील.या परिसंवादास समाजवादी प्रबोधिनीच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आदी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??