आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

शिरोळमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार ३४०० रुपये दर अमान्य : मागचे २०० रुपये व चालू हंगामाचे दर ठरल्याशिवाय कारखाने सुरू नाही: राजू शेट्टी

शिरोळमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार ३४०० रुपये दर अमान्य : मागचे २०० रुपये व चालू हंगामाचे दर ठरल्याशिवाय कारखाने सुरू नाही: राजू शेट्टी 

शिरोळ तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक 

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राज्य व केंद्र शासनाबरोबरच सर्व साखर कारखानदार शेतकरी विरोधी धोरणाचा अवलंब करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत आहेत. सध्याची महागाईची परिस्थिती साखरेचे दर आणि उपपदार्थातून मिळणारा नफा याचा विचार केल्यास गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला २०० रुपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय, आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर ठरल्याशिवाय, साखर कारखाना सुरू करू देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

   युवा गरजवंत ऊस उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश यांच्यासह विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्यावतीने ऊस दराच्या मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी हे बोलत होते. 

सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी चौकात ऊस उत्पादक शेतकरी एकत्रित जमा झाले. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा आला. या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. 

 यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की, संगनमत करून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याच्या दृष्टीनेच ३४०० रुपये दर जाहीर केला आहे. तो आम्हाला मान्य नाही. या वर्षभरात साखरेलाही दर चांगला आहे. उपपदार्थातूनही चांगले उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा हिस्सा देणे बंधनकारक आहे ‌यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसालाही चांगला दर देणे अपेक्षित आहे. यासाठी तात्काळ मागे गाळप झालेल्या ऊसाला २०० रुपयाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही ऊसाच्या कांड्याला कोयता लावू देणार नाही. त्यामुळे शासनानेही यात सहभागी होऊन ऊस दराचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा आमची रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी आहे. असा इशारा दिला.

   यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की कारखानदार दंडूकशाही करून कारखाने सुरू करत आहेत यामुळे शेतकरी एकवटला आहे. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळाला पाहिजे याकरिता आमची लढाई सुरू आहे. यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाला चांगला दर मिळावा. मागील गाळपास आलेल्या ऊसाला २०० रुपये दुसरा हप्ता द्यावा. घोडावत खांडसरीने एफआरपीनुसारच शेतकऱ्यांच्या ऊसाला दर द्यावा. जोपर्यंत ऊस दराचा तोडगा निघत नाही तोपर्यंत घोडावत खांडसरी बंद ठेवावी. शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस तोडी घ्यायच्या नाहीत असा निर्धार करून आम्हा सर्वांना पाठबळ द्यावे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या ऊसाला चार पैसे जादा मिळवून देऊ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला

     माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की आज जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ऊसाचा योग्य दर ठरवण्यात यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पण जर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला नाही. साखर कारखानदारांनी दंडूकशाहीने ऊस आणण्यासाठी प्रयत्न केले आणि कोण म्हणत असेल तर हलगी लावून ऊस आणतो त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी चौकात ठाण मांडून बसणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

       यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटनेचे यशवंत उर्फ बंटी देसाई, आंदोलन अंकुश चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

या मोर्चाला शिरोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्यावतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले. त्यांनीही शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??