शिरोळ येथील कै. श्रीपती माने कृष्णामाई पाणी पुरवठा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत – सर्व विषयांना मंजुरी

शिरोळ येथील कै. श्रीपती माने कृष्णामाई पाणी पुरवठा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत – सर्व विषयांना मंजूरी
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क:
येथील कै श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन गजानन हरी माने होते. सचिव सर्जेराव माने यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीपती माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला प्रारंभ झाला.
यावेळी माजी अध्यक्ष व संचालक डॉ दगडू माने म्हणाले, कै श्रीपती माने यांनी अपार कष्ट व त्यागातून कृष्णामाई ही शेतीची पाणी पुरवठा संस्था निर्माण केली. त्यांच्या पुण्याईमुळे शेतकऱ्यांची शेती हिरवीगार झाली असून शेतकऱ्यांचा उत्कर्ष झाला आहे. वीज भारनियमन व वातावरणातील बदलामुळे शेती पिकाला पाणी देताना मर्यादा येत असून पीक पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी शेतकरी सभासदांनी स्वतः उपस्थित राहून शेती पिकाला पाणी द्यावे.
या सभेत मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदी घेणे, गतवर्षी प्रमाणेच सभासदांच्या शेतीचे पाणीपट्टी दर कायम ठेवणे यासह पाणीपट्टी वसूलीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे माजी चेअरमन डॉ दगडू माने यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेला उपाध्यक्ष सचिन गंगधर , संचालक लक्ष्मण माने, डॉ दगडू माने, राजेंद्र दाभाडे, नरसिंगा कोळी, रामचंद्र माने, गजानन र. माने, चंद्रशेखर कोळी यांच्यासह बाळू कुंभार, शंकर माने तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते.


