*बहिष्कारानंतर आता निषेधास्त्र* *महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी जोरदार लोकचळवळ*

*बहिष्कारानंतर आता निषेधास्त्र*
*महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी जोरदार लोकचळवळ*
एन. वाय. नवा भारत न्यूज / शिरोळ:
महादेवी हत्तीणीला गुजरात येथील वनतारा येथे नेल्याबद्दल जिओच्या सेवेवर बहिष्कार घालण्याचे सत्र सुरू असतानाच अनेक ग्रामपंचायतींनी या कृतीच्या विरोधात जाहीर निषेधाचे ठराव एकमताने मंजूर केलेले आहेत .सावळवाडी, बुर्ली, मौजे डिग्रज, नांद्रे, पट्टणकोडोली, आलास, कोथळी, अंकली, कुंभोज व अनेक ग्रामपंचायतींनी श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी येथील हत्तीणीला गुजरात येथे येथील वनतारा येथे नेल्याबद्दल जाहीर निषेधाचे ठराव एकमताने मंजूर केले असून महाराष्ट्र शासनाने यात हस्तक्षेप करून तीव्र जन भावनेचा आदर करून या हत्तीणीला पुन्हा एकदा नांदणीच्या मठामध्ये परत आणावे अशी विनंती करण्यात आलेली आहे.
दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली असून याबाबतीत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे
याचबरोबर आमदार सतेज पाटील यांनी लाखो सह्यांची मोहीम हाती घेतली असून हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून हत्तीणीला परत पाठवण्यासाठीची विनंती करण्याची तयारी सुरू केलेली आहे.
काल आमदार जयंत पाटील यांनीही महादेवी हत्तीण हा महाराष्ट्र कर्नाटक येथील सर्वधर्मीय नागरिकांच्या आस्थेचा विषय असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट करून पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केले. खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आपले स्वतःचे जिओचे सिमकार्ड पोर्ट करून आपला निषेध व्यक्त केला.
या घटनेचे प्रतिसाद फक्त सांगली कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले असून महादेवीला परत आणण्यासाठी जनमानसातून जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. या भावनिक विषयावर योग्य विचार करून पुन्हा एकदा महादेवीला नांदणीमध्ये आणले जाणार का? असा प्रश्न तूर्तास सर्व नागरिक, नेते, भाविक व एकूणच जनसामान्यातून विचारला जात आहे.