कंत्राटदार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे -89 हजार कोटींची बिले थकली राज्यभर धरणे आंदोलन
कंत्राटदार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
–89 हजार कोटींची बिले थकली राज्यभर आंदोलन
कोल्हापूर
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शासनाकडून प्रलंबित बिले जमा केली नसल्यावरून मंगळवारी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनाचे वतीने मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रतील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागाकडील अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत. विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन, मोर्चा, लाक्षणिक उपोषण अशा अनेक लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या १० महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत.
तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक ष्यावी अशी तीन चार वेळा विनंतीपत्रेही दिली आहेत. पण याबाबत फक्त संबंधितांचे सचिव व संबधित इतर मंत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही ही खेदजनक बाब आहे. शासनाच्या कुचकामी धोरणामुळे कंत्राटदार अभियंता बंधु यांनी आपले जीवन संपविले. याचा राज्यातील कंत्राटदारांना जबरदस्त धक्का बसला. यामुळे निराशेपोटी राज्यातील अनेक कंत्राटदार लोकांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या जीवनाचे बरेवाईट करण्याची घोषणा केली होती, परंतु राज्य संघटनेने हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे; अशा शुभदिनी हे कृत्य करू नये, यासाठी कंत्राटदारांचे मतपरिवर्तन केले.यामुळे पुढील सर्व अनर्थ टळले असे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या मागण्यांचा विचार न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य कंत्राटदार सहभागी झाले होते.