सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा उपमुख्यमंत्री अजित पवार* ” १०० दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर ” अभियानाचा शुभारंभ

सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा उपमुख्यमंत्री अजित पवार
” १०० दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर ” अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिक टाळणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा. तसेच विविध कार्यालयांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बॉटल टाळा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून 25 ऑगस्ट ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘100 दिवस प्लॅस्टिक बंदी अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ या टॅग लाईनचा प्रचार, प्रसार करण्यात येणार असून या प्लॅस्टीक बंदी अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे अनावरण व माहिती परिपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्लॅस्टिक न वापरण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग घ्या. अभियानात स्वयंसेवी संस्था व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्या. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा. सूक्ष्म नियोजन करुन व विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्लास्टिकच्या अनावश्यक व वाढत्या वापरामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे भूमीगत वाहिन्या, चेंबर, गटारी, नाले तुंबल्यामुळे तसेच नदीमध्ये प्लास्टिक वाहून आल्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तसेच मंदिरे, गड, किल्ले, उद्याने, रस्ते अशी सार्वजनिक ठिकाणे प्लास्टिक कचऱ्यामुळे विद्रूप होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांच्या दरम्यान प्लास्टिक बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद केला असून याऐवजी कार्यालयात स्टीलच्या बाटल्या वापरण्यात येत आहेत.
प्लास्टिक बंदी अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. याच दृष्टिकोनातून 25 ऑगस्ट ते 3 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात प्लास्टिक बंदी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील डिजिटल बोर्ड व होर्डींग्जवर ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ ही टॅग लाईन व स्लोगन प्रसारित करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकचे चहाचे पेले, पत्रावळी, प्लेट, बाऊल, चमचा, स्ट्रॅा, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, हॅडल असलेली प्लॅस्टिकची पिशवी असे एकल वापराचे प्लॅस्टिक टाळण्याचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच याची व्यापर जनजागृती कागदी, कापडी पिशव्यांचा वापर, स्टील अथवा अन्य धातूंची कायमस्वरुपी बाटल्यांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्लॅस्टिक बंदी अभियानात विविध ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, क्रीडा संस्था, माध्यमे, मंदिरे, उद्योजक, व्यापरी, हॉटेल, फेरीवाले, विविध संस्था, संघटना, विविध गट, बचतगट, अंगणवाडी, केटरींग, व्यावसायिक, फेरीवाले संघटना, एमआयडीसी, किरकोळ फळे, फुले, भाजीपाला विक्रेते, आदींच्या सहभागातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी प्लॅस्टिक विरोधी घोषवाक्य, पथनाट्य, रिल्स, पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.