ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोपर्डे प्रतिष्ठानचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार जयसिंगपूर येथील ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांना प्रदान 

कोपर्डे प्रतिष्ठानचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार जयसिंगपूर येथील ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांना प्रदान     

सातारा – एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क.

महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी स्त्री शक्तीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी भारतात स्त्री पुरुष समतेचे बीजारोपण केले. तो विचार समाजामध्ये रुजवणाऱ्या प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार हे स्त्री शक्तीचा सन्मान करणारे आहेत,असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्षाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने २०२५ चा साहित्य क्षेत्राचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार जयसिंगपूर येथील ज्येष्ठ कवी,कादंबरीकार नीलम माणगावे यांना व समाज परिवर्तन क्षेत्राचा सात- तारा जीवनगौरव पुरस्कार मुरबाड -ठाणे येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांना डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.                                                   

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे, साहित्य समीक्षक, अभ्यासक डॉ.गजानन अपिने पुणे,कवी वसंत शिंदे सातारा, ज्योत्स्ना पाटील- शिंदे मुंबई आदी मान्यवर विश्वस्त उपस्थित होते. यावर्षीच्या पुरस्काराचे हे पाचवे तर एकूण पुरस्काराचे दहावे वर्ष होते.

यावेळी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या आर्ष पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या “बभ्रा” या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

 जीवनगौरव पुरस्काराने पाठबळ, प्रोत्साहन मिळाल्याची भावना पुरस्कार विजेत्या इंदवी तुळपुळे, नीलम माणगावे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवर पाहुण्यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ.भारती पाटील यांचे ‘स्त्री – पुरुष समानता आणि आजचे वास्तव ‘या विषयावर भाषण झाले. फुले,आंबेडकर, गांधीजी या थोर युगपुरुषांनी समताधिष्ठित समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले. ते खऱ्या अर्थाने साकार होण्यासाठी लोकशाही व भारतीय संविधानाची मूल्ये समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. स्त्रीमुक्ती नव्हे तर स्त्री-पुरुष समता, निरोगी सहजीवन आपल्याला हवे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले. 

 प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी उपक्रमामागील भूमिका विशद करून भारतीय संविधान उद्देशिका व त्याची मूल्ये टिकविली पाहिजेत असे सांगितले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??