कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर चप्पलने संपूर्ण देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तथापि एवढ्यावरच समाधान न मानता येथील कारागिरांनी हा ब्रँड संपूर्ण विश्वात पोहोचवावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली .
गारगोटी रोडवर कळंबा येथे असलेल्या, ‘जय पॅलेस’ या ठिकाणी हॅंन्डक्राफ्ट आर्टिस्ट डेव्हलपमेंट सोसायटी – कोल्हापूर यांच्यावतीने, ‘कोल्हापुरी चप्पल कारागीर’ एकदिवसीय कार्यशाळा भरविण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते .
ते म्हणाले, येथील कारागिरांनी सबसिडी ओरिएंटेड काम करू नये. जिल्ह्यातील बँकर्स व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या व्यवसायाची वृद्धी करावी तसेच भविष्यात अशा कार्यशाळांची संख्या वाढविण्यात यावी जेणेकरुन प्राडाचा ब्रँड कमी होऊन कोल्हापूर ब्रँड निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. केवळ चर्मकार बांधवांनीच नव्हे तर समाजातील इतर बांधवांनीही शासनाच्या योजनांचा विविध पातळ्यांवर लाभ घ्यावा. येथील कोल्हापुरी चप्पल ब्रँड संपूर्ण विश्वात पोहोचवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जातील तर आ. माने म्हणाले, ‘हा व्यवसाय करत असताना समाज बांधवांनी सचोटीने व प्रामाणिकपणाने हा व्यवसाय देश पातळीवर वाढवावा. कोल्हापूरी चप्पलच्या गुणवत्तेबाबत कारागिरांनी कोणतीही तडजोड करु नये
याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाचे विभागीय अधिकारी अमोल शिंदे, व्यवस्थापक एन. एम. पोवार, करवीर गटविकास अधिकारी संदीप भंडारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ, नाबार्डचे अशुतोष जाधव, हस्तकला (हस्तशिल्प ) विकास आयुक्त पल्लवी जांबुळकर, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक मंगेश पवार, सोसायटी अध्यक्ष दीपक यादव, सचिव जयवंत सोनवणे, दत्तात्रय बामणीकर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती हमिदा देसाई यांनी केले.