डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी
शिरोळ : एन.वाय. नवा भारत न्यूज लाईव्ह
सन २०२५ मध्ये साजरा केला जाणारा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होण्यासाठी उपाय योजना करावी याबाबतचे निवेदन कल्लेश्वर तलाव ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने शिरोळ पोलीस ठाण्यास देण्यात आले
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव २०२५ हा सण, महाराष्ट्रात राज्य गणेशोत्सव म्हणून घोषित केला आहे. तथापि स्वातंत्र्यपूर्व काळापासुन, राज्यामध्ये गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात उत्साहाने साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यापूर्व काळापासून, गणेशोत्सवामध्ये प्रबोधनाचे काम केले जात आहे. या प्रबोधनामुळे महाराष्ट्रात पुरोगामी विचार रुजले आहेत. पारंपारीक वाद्य संस्कृतीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केल्यामुळे सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम केले जात आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, गणेशोत्स साजरा करण्याचे स्वरुप बदलले आहे. या बदलत्या स्वरुपामुळे, वायफळ खर्चाला तसेच लहानमुले, गर्भवती महिला, वयोवृध्द, यांच्यासह युवकांच्या आरोग्यावरती घातक परिणाम झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. डॉल्बी अथवा डीजे सिस्टीममुळे, श्रवणशक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब यासह अनेक मानसिक आजार, समाजातील विविध घटकांना झाले आहेत. याशिवाय लेसर प्रणालीद्वारे मिरवणुका काढल्यामुळे दृष्टीवरती विपरीत परीणाम झाले आहेत. या सर्व बाबीच्या अनुषंगाने, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार यांनी स्वस्थ व सुरक्षित कोल्हापूर ठेवण्याकरीता गणेशोत्सव हा सण पर्यावरण पुरक व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, प्रबोधन सुरु केले आहे ही बाब अभिनंदनीय आहे. शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहेत. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पर्यावरणपुरक व डॉल्बीमुक्त गणशोत्सव साजरा करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात, अथवा प्रसंगी कायद्याची कडक अंमजबजावणी करावी. अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर खंडेराव हेरवाडे, डी. आर. पाटील, आण्णासो चावरे, कृष्णा भाट, बाळासो गावडे, दिलीप कोळी, सुभाष आवळे, दत्ता पुजारी, शिवाजी पाटील, अण्णासो पाटील, बाबाचा पूदें, बापूसाहेब गंगधर, रामचंद्र जाधव, प्रभाकर गाडगीळ, अशोक कांबळे, चंद्रकांत भोरे, यांच्यासह साठहून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.