ताज्या घडामोडी

कृषीमंत्री भरणे आणि पालकमंत्री आबिटकर यांनी घेतली जमीन क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न ची माहिती

कृषीमंत्री भरणे आणि पालकमंत्री आबिटकर यांनी घेतली जमीन क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न ची माहिती

 


क्षारपडमुक्तीच्या कामाला शासनाची मदत करण्याची मंत्र्यांनी दिली ग्वाही

शिरोळ एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांना श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्न ची माहिती मुंबई मंत्रालयातील दालनात देण्यात आली. ही माहिती सांगण्यासाठी मंत्र्यांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना विशेष निमंत्रित केले होते.
गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपडमुक्तीसाठीचे फायदे, त्याची यशोगाथा, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळात क्षारपड मुक्तीसाठी धोरण ठरविताना श्री दत्त पॅटर्नच्या तंत्रज्ञान आणि अनुभवाचा फायदा होईल अशा भावना व्यक्त करून मंत्र्यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाला शासनाच्या वतीने मदत करण्याची भूमिका राहील अशी ग्वाही दिली.
श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देशपातळीवर जमीन क्षारपडी मुळे झालेले नुकसान, श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेले काम, सुमारे चार हजार एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन, जमीन क्षारपड मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश, त्याचे फायदे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत 11 कोटी 46 लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न, आगामी काळात क्षारपड मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा, दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगितता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न, अशा विविध बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या समोर सविस्तरपणे मांडला.
कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपड कमी करून, शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे व उत्पादनक्षमता वाढवणे हा आहे. जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे मत मांडले.
यावेळी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, कीर्तीवर्धन मरजे, अजिंक्य पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??