ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पानिपत’कार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

‘पानिपत’कार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


 


पुणे:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क


सातार्‍यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रंगनाथ पठारे, बाळ फोंडके यांचीही नावे चर्चेत होती. सुरुवातीला ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. अखेरीस ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबरीसाठी प्रसिद्ध असलेल्या विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे.उद्घाटनाच्या आदल्या दिवशी ग्रंथडिंडी काढली जाणार असून त्याच दिवशी ग्रंथप्रदर्शन, कविकट्टा आणि बालकुमारांसाठी आनंदमेळावा सुरू होईल.चार दिवसांमध्ये ग्रंथप्रदर्शन, कवी संमेलन, कादंबरी कार्यशाळा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि विविध साहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत.

यंदा प्रथमच सर्व पदाधिकारी, संमेलन सन्मानप्राप्त साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक तसेच माजी अध्यक्षांना निमंत्रित करण्यात येईल.

विश्वास पाटील यांचा साहित्यिक प्रवास: विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील नामवंत कादंबरीकार असून त्यांच्या लेखनशैलीत सखोल संशोधन, प्रवाही भाषा आणि प्रभावी चित्रण यांचा सुंदर मेळ दिसतो. ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे वास्तवदर्शी वर्णन हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे.त्यांच्या उल्लेखनीय लेखनामध्ये = पानिपत , झाडाझडती, सिंहासन चंद्रमुखी,महाड ,स्मरणगंध महानायक अशा कसदार साहित्याचा समावेश आहे.


साताऱ्यातील संमेलनांची परंपरा : साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी येथे 1905, 1962 आणि 1991 मध्ये संमेलने झाली आहेत. शेवटचे म्हणजे 66 वे संमेलन 1991 साली शाहू स्टेडियमवरच झाले होते.या पार्श्वभूमीवर यंदाचे 99 वे संमेलन ऐतिहासिक ठरणार असल्याची साहित्यिकांमध्ये उत्सुकता आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??