बाल शिवाजी मंडळ (राजवाडा) ठरलं गणराया ॲवार्ड- २०२५ चा मानकरी

बाल शिवाजी मंडळ (राजवाडा) ठरलं गणराया ॲवार्ड- २०२५ चा मानकरी
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव काळात चांगल्या देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळांना गणराया ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते. शिरोळ पोलीस ठाण्याअंतर्गत शहरी विभागामध्ये शिरोळच्या बाल शिवाजी मंडळ,राजवाडा -प्रथम क्रमांक, नृसिंह मित्र मंडळ नृसिंह चौक द्वितीय क्रमांक, श्रीराम मंडळ नदीवेश -तृतीय क्रमांक तर बाल गजराज मंडळ, काळे गल्ली यांना उत्तेजनार्थ गणराया ॲवार्ड देऊन गौरविण्यात आले.
यापूर्वीही बाल शिवाजी मंडळाने १० वेळा प्रथम क्रमांकाचे गणराया ॲवार्ड मिळवले आहेत.
शिरोळ शहरात दरवर्षी विविध मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक,धार्मिक तसेच ऐतिहासिक देखावे सादर केले जातात. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यातून समाज प्रबोधन केले जाते. यावर्षी बाल शिवाजी मंडळ राजवाडा येथे काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशाने पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले होते. या ऑपरेशन सिंदूर आधारित सजीव देखावा सादर करून राष्ट्राभिमान आणि देशप्रेम जागृत करण्याचा सामाजिक संदेश दिला. हा देखावा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. अंगावर शहारे आणणारी देखाव्यातील दृश्ये पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू तरळत होते.
या मंडळांने गेल्या वर्षी समाजामध्ये वावरत असताना महिलांच्यावर होणारे अत्याचार आणि महिला सुरक्षित नाहीत या अनुषंगाने कायद्याच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन जगणारा एक बहे बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर करून त्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम केलं होतं. तसेच रक्तदान शिबिर, नवोदित खेळाडूंसाठी मैदानी खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, वजनी गटातील कबड्डी स्पर्धा वृक्षारोपण, यासह विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून गणराया ॲवार्ड मिळवला आहे.
बाल शिवाजी मंडळाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्षे विविध सामाजिक धार्मिक ऐतिहासिक तसेच कौटुंबिक समाजप्रबोधनात्मक सजीव देखावे सादर केले आहेत त्यामध्ये १५० महिला व पुरुष कलाकार हत्ती, घोडे, उंट यांच्यासमवेत जाणता राजा सजीव देखावा,
२०२२ साली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहीद भगतसिंग या क्रांतिकारकाचं जीवन चरित्र देखाव्याच्या माध्यमातून दाखवलं होतं २०२३ साली संत बाळूमामा हा देखावा सादर केला होता. तसेच यापूर्वी अणुचाचणी-पोखरण, स्त्री भ्रूण हत्या , ज्ञानियांचा राजा, गरिबांनी जगायचं कसं, छत्रपती संभाजी महाराज, गाथा छत्रपतींची, असे अनेक सजीव देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम या बाल शिवाजी मंडळांने केले आहे. यावर्षी सादर केलेल्या ऑपरेशन सिंदूर या सजीव देखाव्यास प्रथम क्रमांकाचा गणराया ॲवार्ड प्राप्त झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, शिरोळ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बाल शिवाजी मंडळास प्रथम क्रमांकाचा गणराया ॲवार्ड प्रदान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील सचिव अण्णासो गावडे, बाळासाहेब गावडे (साहेब), गजानन संकपाळ, प्रकाश गावडे, चंद्रकांत गावडे, शिवाजी पुजारी, बुधाजी चुडूमुंगे, भालचंद्र ठोंबरे, दिलीप संकपाळ, नरेंद्र माने, तेजस पाटील, ऋषिकेश चुडमुंगे, अक्षय माने, पारस भाट, सचिन मोरे, ग्रुरुप्रसाद पाटील, सागर चुडमुंगे यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ सभासद तरुण कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.
बाल शिवाजी मंडळाने सजीव देखाव्यात २०२२ साली शहीद भगतसिंग देखाव्यात ब्रिटिश पार्लमेंट मध्ये भगतसिंग यांनी केलेला बॉम्बहला, २०२३ साली संत बाळूमामा देखाव्यात भांडाऱ्यातून येणारा जाळ, २०२४ साली बापू बिरु यांनी स्वतः च्या मुलावर झाडलेली गोळी तसेच यावर्षीच्या ऑपरेशन सिंदूर या देखाव्यात विमानातून केलेला बॉम्ब हल्ला, सैनिकांवर झालेला गोळीबार असे अनेक अप्रतिम देखावे सादर केले होते.


