आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

एमपीएससी मध्ये हेरवाडची उत्कर्षा सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी

एमपीएससी मध्ये हेरवाडची उत्कर्षा सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी

 




शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

हेरवाड (तालुका शिरोळ) येथील कु. उत्कर्षा उषा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट – ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 मध्ये मोठे यश संपादन केले. ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकावला असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात 14 व्या क्रमांकावर आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक (STI) या पदासाठी झाली आहे.

उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिर हेरवाड व नृसिंहवाडी येथे झाले. त्यानंतर ८ वी ते १० वी पर्यंत तिने एस. पी. हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढे ११ वी-१२ वी शिक्षण संजय घोडावत विद्यापीठात घेत इंजिनियरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडले. जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला.

यानंतर पुण्यात तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली. दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केली. तिने एकदा यूपीएससी परीक्षा दिली असता यश मिळाले नाही, मात्र हार न मानता एमपीएससी परीक्षेत तिने हे झळाळते यश मिळवले आहे.

माझ्या यशामागे दिवंगत दामोदर सुतार गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे, ते आज असते तर आणखी मोठा आनंद झाला असता, असे ती भावुकतेने म्हणाली.
तिच्या यशात अशोक माळी, राणी नेर्ले, राजू जुगळे, तुकाराम राजूगडे, विजया पाटील, आशिष लठ्ठे, निता पाटील, सविता उपाध्ये, तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, एस. पी. हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, जयसिंगपूर कॉलेजचे डॉ. सुभाष आडदांडे, महावीर पाटील, प्राचार्य व प्राध्यापक, तसेच घोडावत विद्यापीठातील शिक्षक अतुल मासोले, उत्कर्ष परीसर विकास मंचच्या सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि साथ तिला मिळाली आहे.

उत्कर्षा आपल्या यशाबद्दल म्हणाली, यश मिळवायचे असेल तर सातत्य, संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास नियोजनपूर्वक करावा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. माझं अंतिम ध्येय आयएएस अधिकारी होणं असून आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घेणार आहे.तिच्या या यशामुळे हेरवाड गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??