मूर्तींची चोरी : महिलेला जयसिंगपूर पोलिसांनी केली अटक

मूर्तींची चोरी : महिलेला जयसिंगपूर पोलिसांनी केली अटक
जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
चांदीच्या देवाच्या मुर्ती चोरणाऱ्या प्रभा दत्तात्रय महाडिक (वय ६८, रा.कोरेगावकर कॉलनी पुलाची शिरोली, ता.करवीर) या महिलेला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दोन दिवसा पूर्वी अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी येथे चोरीची घटना घडली होती.
घरातील चांदीच्या वेगवेगळ्या देवांच्या मुर्त्या स्वच्छ करुन बाहेर ठेवल्या होत्या. त्या चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (दि. २३) घडली होती . याबाबतची फिर्याद अनघा अनिल कुलकर्णी यांनी दिल्यानंतर गुन्हेशोध पथकाने तपासयंत्रणा राबवली. परिसरातील सीसीटीव्हीची फुटेजची पाहणी करण्यात आल्यानंतर फुटेजमध्ये संशयित महिला आढळून आली. चांदीच्या वस्तू विक्री करण्यासाठी जयसिंगपूर बसस्थानकावर महिला
येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पिशवीची तपासणी करण्यात आली यावेळी चांदीच्या मुर्त्या तिच्याकडे मिळून आल्या. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.


