शिरोळकरांच्या दातृत्वाने पूरग्रस्तांना दिलासा – आ. अभिजीत पाटील

शिरोळकरांच्या दातृत्वाने पूरग्रस्तांना दिलासा – आ. अभिजीत पाटील
शिरोळच्या श्री.गुरुदत्त सोशल फाउंडेशनकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स प्रदान
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
अस्मानी संकटामुळे राज्यात महापुराने थैमान घातले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना घरदार सोडावे लागले. अशा काळात मदत नव्हे तर कर्तव्य समजून शिरोळकरांनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. असे प्रतिपादन पंढरपूर माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले.
शिरोळ येथील श्री गुरुदत्त सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने यांच्यासह मित्र परिवाराने माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पंढरपूर येथे आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचे किट्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार अभिजीत पाटील हे बोलत होते.
आमदार अभिजीत पाटील बोलताना पुढे म्हणाले की महापुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण मदतीला धाऊन येत आहे. त्यामुळे आपल्या पाठीशी समाज असल्याच्या दिलासा पूरग्रस्तांना मिळत आहे. यातूनच समाजातील चांगुलपणाचे दर्शन घडते. मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून शिरोळमधील युवकांनी एकत्रित येऊन केलेली मदत पूरग्रस्तांना दिलासा देणारी ठरेल. माझ्या आवहनास आपण प्रतिसाद देऊन माणुसकीचे दर्शन घडवले असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार चंद्रकांत भाट म्हणाले की; शिरोळ तालुक्यातील महापुराच्या काळात राज्यातील प्रत्येक भागातील जनतेने भरघोस मदत करून आमच्या पूरग्रस्तांचे संसार उभे केले. आज राज्यावर आलेल्या संकटाची जाणीव प्रत्येकाच्या मनात आहे. ज्या पद्धतीने शिरोळकरांच्या मदतीला राज्य उभे राहिले. त्याच पद्धतीने आता पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न शिरोळ तालुक्यातील जनतेतून होत आहे. एक खारीचा वाटा म्हणून पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निर्णय उद्योजक अभिजीत माने यांच्या पुढाकारातून तरुणांनी घेतला आहे.
पूरग्रस्त जनतेला तालुक्यातून शक्य तितकी मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक अभिजीत दिलीपराव माने, भागवत चौगुले कर्नाळे, उदय संकपाळ (शिलेदार), पृथ्वीराज माने देशमुख, सचिन सावंत,रमेश पाटील, कर्णसिंह जगदाळे, सचिन माने गावडे, सुरज मोरे, दीपक बिसूरे, बाळासो पुजारी, राजवर्धन माने,राजेश पाटील, मुरली कुंभार, महेश पाटील, किरण माने, गजानन चव्हाण, रामभाऊ पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


