आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ कायम 

कारखान्याने नेहमीच जपली सामाजिक बांधिलकी पूरग्रस्त 10 तालुक्यांसाठी 10 ट्रक मधून जीवनावश्यक वस्तू रवाना

श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ कायम 

कारखान्याने नेहमीच जपली सामाजिक बांधिलकी पूरग्रस्त 10 तालुक्यांसाठी 10 ट्रक मधून जीवनावश्यक वस्तू रवाना

शिरोळ: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

 मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव (दादा) पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरोळ तालुक्यातून विविध गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली. या आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू सहित रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा विविध संस्थांनी मदत केली. एकूण दहा पूरग्रस्त तालुक्यांसाठी 10 ट्रक मधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. तहसीलदार अनिलकुमार हेळकर, उद्यानपंडित गणपतराव पाटील, श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत या गाड्या पाठवण्यात आल्या.

      गेल्या महिन्याभरापासून राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाऊंडेशन व श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत गोळा करण्यात आली. 

    श्री दत्त साखर कारखान्याच्या सर्व कामगारांनी उस्फूर्त सहकार्याची भावना ठेवून आपला एक दिवसाचा पगार सुमारे 10 लाख रुपयांची मदत दिली.

      शिरोळ तालुक्यामधून पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या साहित्यामध्ये तांदूळ 31टन, ज्वारी 5 टन 930 किलो, गहू 11 टन 735 किलो, तेल 1000 लिटर, साखर 5 टन 800 किलो, आटा पीठ 1 टन 150 किलो, पाणी बॉटल्स 350 बॉक्स, चादर व ब्लँकेट 2100 नग, यासह इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या. 

सदर साहित्याचे 7800 किट्स बनवण्यात आले असून प्रति किट मध्ये तांदूळ पाच किलो, साखर दोन किलो, रवा एक किलो, तुरडाळ एक किलो, शेंगदाणे अर्धा किलो, चहा पूड, तिखट, जिरे, मोहरी व गोडेतेल असे एकूण दहा तालुक्यांसाठी दहा ट्रक मधून या जीवनावश्यक वस्तू आज रवाना करण्यात आल्या. या तालुक्यांमध्ये परंडा (जिल्हा धाराशिव), भूम (जिल्हा धाराशिव), कण्हेरवाडी व केळेवाडी (तालुका वाशी, जिल्हा धाराशिव), नळदुर्ग (जिल्हा धाराशिव), पाटोदा (जिल्हा बीड), शिरूर कासार (जिल्हा बीड), गेवराई (जिल्हा बीड), करमाळा (जिल्हा सोलापूर), मोहोळ (जिल्हा सोलापूर) व नांदेड यांचा समावेश आहे.

      श्री दत्त साखर कारखान्याने आतापर्यंत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त जनतेला मदत केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्त जनतेलाही आधार देण्याची भूमिका घेऊन ही मदत पाठविली असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली. 

    यावेळी कारखाना सर्व संचालक मंडळ, खातेप्रमुख यांच्यासह विविध मान्यवर तसेच सा. रे. पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??