आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निवासी शाळा – काळाची गरज

विशेष लेख :

निवासी शाळा – काळाची गरज :

एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पल्या भारतीय संस्कृतीत गुरु आणि गुरुकुल परंपरा हे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे गौरवशाली मानचिन्ह आहे. प्राचीन काळापासून गुरुगृही राहून ज्ञान संपादन करणे हा नियम पाळला जात असे आणि त्यातूनच नालंदा, तक्षशिला अशी जगप्रसिद्ध विद्यापीठे या भरतभूमीने निर्माण केली जोपासली व ज्ञानसंपन्न पिढ्या निर्माण केल्या. अवतारी देवतांनी गुरुगृही राहून ज्ञानार्जन केल्याचे दाखले आपल्याला पुराणकाळात दिसून येतात. कालांतराने गुरुकुल पद्धतीत बदल होत गेले आणि रवींद्रनाथ यांचे शांतीनिकेतन अशा मर्यादित स्वरूपात गुरुकुल संस्कृती जपण्याचा प्रयत्न झाला मात्र याचे सार्वत्रिकरण होऊ शकले नाही.

कालौघात ब्रिटिश राजवटीत आपल्या अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळांची स्थापना ब्रिटिशांनी केली. म्हणजे यापूर्वीची भारतातील गुरुकुल पद्धत पुन्हा एकदा इंग्रजी राजवटीत निवासी शाळांच्या रूपाने प्रस्थापित झाली व देशात सर्व दूर पसरली. या शाळा मुख्यत्वे करून थंड हवेच्या ठिकाणी उभ्या केल्या जात असत शांतता, निसर्गसानिध्य, मुक्तपणे शिकण्याची संधी, शिस्त व स्वावलंबन ही या शाळांची बलस्थाने होती. 

स्वातंत्र्योत्तर काळातही समाजमनाला निवासी शाळांचे महत्त्व स्वीकारणे क्रमप्राप्त ठरले याचे फलित म्हणजे मागील 75 वर्षांमध्ये राजीव गांधी, संजय गांधी, रतन टाटा, वीरेंद्र सेहवाग, अमिताभ बच्चन, शशी थरूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर कपिल सिब्बल, सुनील छेत्री, प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई असे विविध क्षेत्रातील दिग्गज लोकही एकेकाळी निवासी शाळेचे विद्यार्थी होते हे आपण नाकारू शकत नाही.

सध्याच्या गतिमान युगातसुद्धा अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना निवासी शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला; याचे कारण निवासी शाळा अध्ययनासोबतच कला, क्रीडा, विज्ञान, आणि चारित्र्य अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत केवळ शिक्षणाचे नव्हे तर संस्काराचेही केंद्र बनल्या. याच सोबत सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल वर्गखोल्या, आधुनिक सुविधांयुक्त वसतिगृहे,विविध प्रकारच्या खेळांची सोय या व अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे शिक्षण आनंददायी बनले आणि वसतिगृह हे विद्यार्थ्यांसाठी दुसरे घर बनले.                                               

2020 च्या कोविडच्या संकटामुळेच समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रावर देखील अत्यंत प्रतिकूल परिणाम झाले. या काळात ऑनलाइन अध्यापन-अध्ययन प्रक्रियेसाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात मोबाईल दिले आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला अणि विद्यार्थी मोबाईलच्या मायाजालात अडकत गेले परिणामी विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव, चिंता, एकाकीपण अशा समस्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे त्यांच्या वर्तनामध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता अणि उदासीनता आल्याचे दिसून आले. लॉकडाऊन नंतर अनेक विद्यार्थी शिक्षक, पालक व मित्र मैत्रिणी यांच्याशी उद्धटपणे वागताना आढळतात. 

दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भातील पालकांच्या अवास्तव अपेक्षा अणि विद्यार्थ्यांची अभिरुची व शैक्षणिक क्षमता यामध्ये यामध्ये अंतर पडत गेले. याचा परिणाम म्हणून देशभरामध्ये अनेक वैफल्यग्रस्त विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शिक्षण क्षेत्रामध्ये मुख्य पदांवर काम करत असलेल्या पालकांची मुलेदेखील पालकांच्या अवाजवी अपेक्षांचे बळी ठरली.

 सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (ए.आय.) आगमनने नव्या क्रांतिकारी युगाला सुरुवात झाली. ही क्रांती आपल्या प्रचंड वेगाबरोबरच आणि प्रत्येक गोष्टींच्या उत्तरांबरोबरच काही नवे प्रश्न निर्माण करू लागली. मोबाईल, लॅपटॉप, टॅब् यामुळे कागदविरहित शिक्षण प्रणालीचा प्रवाह सुरू झाला आणि विद्यार्थ्यांचे लिहिते हात गॅजेटमध्ये अडकून पडले. त्यांची कल्पकता, सर्जनशीलता या गोष्टींवर मर्यादा आल्या. लेखन कौशल्यामध्ये विद्यार्थी मागे पडू लागले. समाजमाध्यमे विद्यार्थ्यांना फार जवळची झाली आणि समाजमाध्यमावरील घटनांचे पडसाद त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पडू लागले. 

अलीकडच्या काळात काही निवासी शाळांत मुलांमधील झालेल्या अप्रिय घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या. या घटनांमुळे एकूणच सर्व निवासी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला गेला; मात्र कोणतीही शाळा हा समाजाचा आरसा असते. समाजाचेच प्रतिबिंब शाळारूपी आरशात प्रतिबिंबित होत असते त्यामुळे झालेल्या घटनेचा विचार करत असताना त्या घटनेची पाळेमुळे कशात आहेत याचाही विचार करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाने विद्यार्थ्यांच्या वर्तनात अनिष्ट बदल होत आहेत. निवासी शाळा समाजाला नेतृत्व देणारी नवी पिढी तयार करतात हे समाजमान्य सत्य आहे. 

वरील सर्व घटनांचा परिणाम म्हणजे आजच्या आव्हानात्मक जगात पाल्यांच्या सुरक्षित आणि निवासी स्वरूपाच्या शिक्षणाकरिता पुन्हा एकदा गुरुकल पद्धतीचे महत्व अधोरेखित होत आहे. समाजमाध्यमांकडे आकर्षित झालेला आपला पाल्य निवासी ज्ञानसंकुलामध्ये मोबाईलपासून दूर असेल, तेथे त्याचे वेळोवेळी समुपदेशन होईल, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील, रोजच्या अभ्यासिका, खेळ, योगाभ्यास, विविध कला-कौशल्यांचे प्रशिक्षण, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करिअर संदर्भातील मार्गदर्शन, संवाद सत्रे, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या पाल्याचा संस्कारक्षम आणि सर्वांगीण विकास होईल व तो निर्मितीक्षम कार्यात मग्न राहील हे ओळखून आजचे बहुतांशी पालक आपल्या पाल्यांना निवासी शाळांमध्ये शिकवण्या संदर्भात आग्रही होताना दिसत आहेत. निवासी शाळांच्या कार्यप्रणालीच्या माझ्या तीन दशकांच्या अनुभवांती मी निश्चितपणे सांगेन की येणाऱ्या गतिमान आणि परिवर्तनशील युगामध्ये निवासी शाळा या पालक आणि पाल्य यांच्याकरिता आधारस्तंभ सिद्ध होतील. या संदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाने देखील मेकॅलोच्या कालबाह्य पारंपारिक शिक्षण प्रणालीची चौकट आता नव्याने विस्तारली पाहिजे. आनंददायी, जीवनकौशल्ये विकसित करणारा अभ्यासक्रम ही आजच्या नव्या युगाची गरज शिक्षण तज्ज्ञांनी जाणली पाहिजे. पालकांनी नव्या शिक्षण पद्धती संदर्भात आपले विचार मुक्तपणे व्यक्त केले पाहिजेत असे मला वाटते. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी नेहमी सुसंवाद साधला पाहिजे. त्यांच्या आवडी-निवडी, छंद समजून घेतले पाहिजेत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन क्षेत्रांबरोबरच करिअरची इतरही दालने आहेत हे समजून घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभिरुची आणि शैक्षणिक क्षमतेनुसार करिअर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.   

तात्पर्य असे की वरील विचारांप्रमाणे सकारात्मक बदल झाल्यास येणाऱ्या काळामध्ये निवासी शाळा ही काळाची गरज सिद्ध होतील. पालक अत्यंत विश्वासाने त्यांच्या पोटचे गोळे निवासी शाळेमध्ये प्रविष्ट करीत असतात. पालकांचा विश्वास ही निवासी ज्ञान संकुलातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे या अनुषंगाने आपण सर्वजण सजग राहूया आणि निवासी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संस्कारक्षम जडण-घडणीची सामुदायिक जबाबदारी स्वीकारण्याचा नव्याने संकल्प करूया. तीन दशकांचा माझा अनुभव असा आहे की अन्य शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा निवासी शाळेतील विद्यार्थी हे अत्यंत आत्मविश्वासाने आणि कुशलतेने समाजाचे नेतृत्व करतात. समाजाला असे आदर्श आणि सक्षम नागरिक देण्याची जबाबदारी आपली आहे याचे सदैव स्मरण ठेऊया.

पी. आर. भोसले.   

(चेअरमन – संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, पन्हाळा.)

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??