ऑटो न्यूज:-
ई-20 मुळे जुन्या वाहनांचे मायलेज घटले:- दुरुस्ती खर्चही दुपटीने वाढला LocalCircles सर्व्हेतून धक्कादायक बाबी उघड वाहनधारक त्रस्त
सचिन इनामदार – कार्यकारी संपादक. एन.वाय.नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारने देशभरात 20% इथेनॉल मिश्रण असलेले ई-20 पेट्रोल वापरणे अनिवार्य केले. पर्यावरणास हितकर आणि परकीय चलन बचतीसाठी हा निर्णय जरी महत्त्वाचा असला, तरी त्याचे दुष्परिणाम जुन्या पेट्रोल वाहनांवर प्रकर्षाने दिसू लागले आहेत. LocalCircles या नागरी जनमत संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 2022 किंवा त्याआधीची पेट्रोल वाहने वापरणाऱ्या दहा पैकी आठ वाहनधारकांना आता त्यांच्या गाड्यांचे मायलेज लक्षणीयरीत्या घटल्याचे आढळले.३२३ जिल्ह्यांतील ३६,००० हून अधिक वाहनधारकांवर हा सर्व्हे करण्यात आला. त्यात ६९% पुरुष आणि ३१% महिला सहभागी झाल्या. टियर-१ शहरांतील ४५%, टियर-२ शहरांतील २७%, तसेच ग्रामीण भागातील सुमारे २८% लोकांनी प्रतिसाद दिला. ऑगस्ट 2025 मध्ये मायलेज घटल्याचा अनुभव देणाऱ्यांचा आकडा ६७% होता, तर ऑक्टोबरमध्ये तो वाढून ८०% झाला आहे.
वाढता देखभाल खर्च :

फक्त इंधन कार्यक्षमता कमी नाही, तर जुन्या वाहनांच्या भागांच्या देखभालीत आणि बदलामध्येही मोठी वाढ झाली आहे. २०२५ मध्ये ५२% वाहनधारकांनी इंजिन आणि इंधनसंबंधित दुरुस्ती खर्च वाढल्याचे सांगितले. ऑगस्टमध्ये हा आकडा फक्त २८% होता. इंजिन, फ्युएल लाईन, कार्ब्युरेटर, इनजेक्टर आणि टाकी या भागांमध्ये गंज, गळती, मिसफायरिंग यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.काही वाहनधारकांनी ई-20 पेट्रोलमुळे इंजिनमध्ये पाणी साचल्याने मोठ्या दुरुस्त्या कराव्या लागल्याची तक्रार केली आहे. काही प्रकरणांमध्ये चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीसाठी ४ लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्याचेही नमूद करण्यात आले. अनेक मेकॅनिक्सच्या म्हणण्यानुसार, ई-20 सुरू झाल्यापासून इंधनाशी संबंधित तक्रारी जवळपास ४०% वाढल्या आहेत.
सरकारचा दावा आणि वाहनधारकांची मागणी : केंद्र सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे कार्बन उत्सर्जन घटते आणि साखर उद्योग तसेच शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळते. मात्र, LocalCircles च्या सर्व्हेनुसार वाहनधारकांना याचे आर्थिक ओझे वाढल्याचे वाटते. त्यामुळे अर्ध्याहून अधिक लोकांनी ई-20 पेट्रोल ऐच्छिक करण्याची आणि त्याची किंमत किमान २०% ने कमी करण्याची मागणी केली आहे.
जागतिक स्तरावरील पार्श्वभूमी :
सध्या जगभरात इंधनातील इथेनॉलचे प्रमाण सरासरी ५ ते ६% आहे. अमेरिका आणि ब्राझील हे इथेनॉल उत्पादनात अग्रेसर देश असून, पुढील दशकभरात हा बाजार दुपटीने वाढेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थांनी वर्तवला आहे. भारतात मात्र २०% मिश्रणाची अंमलबजावणी वेगाने केल्याने जुन्या वाहनांवरील परिणाम जास्त जाणवत आहेत.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??