आपला जिल्हाताज्या घडामोडी

किल्ले पन्हाळगडावर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष; ‘मेगा पदयात्रा’ आणि रक्तदान शिबिराने शिवजयंती साजरी

किल्ले पन्हाळगडावर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष; ‘मेगा पदयात्रा’ आणि रक्तदान शिबिराने शिवजयंती साजरी

पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ नामांकनामुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या किल्ले पन्हाळगडावर आज शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा पदयात्रा’ आणि रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पारंपरिक पाळणा सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मुख्याधिकारी चेतन माळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सकाळी ८:३० वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. पन्हाळा नगरपालिकेजवळील शिवमंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा मयूर बागेपर्यंत काढण्यात आली. यात शासकीय कर्मचारी, युवक आणि विविध शाळांतील सुमारे २००० विद्यार्थी सहभागी झाले होते. कुमार विद्यामंदिरचे झांज पथक, संजीवन पब्लिक स्कूलचे घोडे पथक आणि आर. आर. अकॅडमी बोरपाडळे यांच्या लेझीम पथकाने यात्रेची शोभा वाढवली. नरके पब्लिक स्कूल, वारणा कॉलेज, देवाळे हायस्कूल आणि गर्ल्स हायस्कूल नेबापूरच्या एनसीसी (NCC) पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. मयूर बागेत विद्यार्थ्यांनी सादर केलेली मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

जिल्हाधिकाऱ्यांचे दातृत्व: ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’

शिवजयंतीचे औचित्य साधून आरोग्य विभाग आणि तहसील कार्यालयामार्फत १८ व १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केवळ पाहणी न करता स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून, “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

या सोहळ्याच्या निमित्ताने सन २०२४ व २०२५ मधील पर्यावरणपूरक सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आणि किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

संपूर्ण पन्हाळगड परिसर “जय भवानी-जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी दुमदुमून गेला होता. पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??